काळजाचा ठोका चुकविणारी ‘ती’ १४ मिनिटे
By Admin | Updated: January 15, 2016 23:57 IST2016-01-15T23:54:36+5:302016-01-15T23:57:11+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद व मुंबईतील तीन रुग्णांना नवजीवन देण्यासाठी डॉक्टर, कर्मचारी, पोलीस यंत्रणा अटोकाट प्रयत्न करीत होत्या

काळजाचा ठोका चुकविणारी ‘ती’ १४ मिनिटे
औरंगाबाद : मकरसंक्रांतीच्या पहाटे एकीकडे शहर सण उत्साहात साजरा करण्यासाठी जागे होऊ लागले असताना दुसरीकडे औरंगाबाद व मुंबईतील तीन रुग्णांना नवजीवन देण्यासाठी डॉक्टर, कर्मचारी, पोलीस यंत्रणा अटोकाट प्रयत्न करीत होत्या. ब्रेन डेड झालेल्या रुग्णाची एक किडनी धूत हॉस्पिटलमध्ये आणि दुसरी किडनी व लिव्हर मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यासाठी ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले होते. आणीबाणीची वेळ होती. सिग्मा हॉस्पिटलमधून निघालेल्या दोनपैकी एक अॅम्ब्युलन्स किडनी घेऊन धूत हॉस्पिटला अवघ्या ६.३० मिनिटांत, तर दुसरी मुबंईसाठी लिव्हर, किडनी घेऊन चिकलठाणा विमानतळावर ७.१५ व्या मिनिटाला पोहोचली. नंतर विमानातून हे अवयव मुंबईला नेण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरमुळे हा प्रवास यशस्वी झाला अन् सकाळी तिन्ही रुग्णांवर यशस्वीरीत्या अवयव प्रत्यारोपणानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
प्रत्यारोपणासाठी औरंगाबादेतून मुंबईत मानवी अवयव नेण्याचा मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग मकरसंक्रांतीच्या दिवशी यशस्वी झाला.
सरकारी यंत्रणा व लोकसहभाग असल्यास कोणतेही काम अशक्य नाही. हे या घटनेवरून सिद्ध झाले. किडनी व लिव्हरचे प्रत्यारोपण कोणत्या रुग्णांवर होणार हे ना डॉक्टरांना माहीत होते ना पोलिसांना, ना अन्य शासकीय अधिकाऱ्यांना; पण सर्वांना एकच माहीत होते की, आपल्या प्रयत्नामुळे तीन रुग्णांना नवजीवन मिळणार आहे.
ब्रेन डेड झालेला राम मगर याचे अवयव प्रत्यारोपण करण्यास नातेवाईकांनी परवानगी देताच एमआयटी हॉस्पिटलमधून गुरुवार दि. १४ रोजी सकाळी १०.३० वाजता रामला सिग्मा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. प्रत्यारोपणास परवानगी मिळावी यासाठी सिग्मा हॉस्पिटलने यासाठी मुंबईतील झेडटीसीसी (विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती)च्या डॉ. गौरी राठोड, औरंगाबादेतील सिव्हिल सर्जन डॉ. गोवर्धन गायकवाड, पोलीस आयुक्त यांची बुधवार दि. १३ रोजी रात्रीतून परवानगी प्राप्त केली. झेडटीसीसीच्या परवानगीनुसार एक किडनी धूत हॉस्पिटलमध्ये, दुसरी किडनी व लिव्हर मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये व हृदय चेन्नईतील हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय झाला. गुरुवार दि. १४ रोजी दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता रामच्या शरीराची तपासणी करण्यात आली. अवयव प्रत्यारोपणासाठी चांगल्या स्थितीत आहेत, याचा अहवाल हॉस्पिटलमधील ब्रेन स्टेम डेथ डिक्लेरेशन कमिटीने सायंकाळी ७ वाजता दिला.
डॉ. आनंद देवधर, डॉ. उन्मेष टाकळकर व डॉ. अजय रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमध्ये पुढील शस्त्रक्रियेसाठी तयारी सुरू झाली. दुसरीकडे चेन्नईला जाण्यासाठी मुंबईहून चार्टर्ड विमान आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी चेन्नईतील डॉ. मुरलीही येथे आले होते. डॉक्टरच नव्हे तर खुद्द जिल्हाधिकारी निधी पांडे व पोलीस आयुक्त अमितेशकुमारही प्रयत्न करीत होते; पण रात्री ९ ते ११ वाजेदरम्यान मुंबईतून चार्टर्ड विमानाला टेक आॅफ करण्यास परवानगी मिळाली नाही व ११ वाजेनंतर वैमानिक उपलब्ध झाले नाहीत. अखेर रात्री डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपणाचा निर्णय रद्द केला व दोन किडनी आणि लिव्हर प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला. रात्रभर हॉस्पिटलमध्ये आणीबाणीचे वातावरण होते. सिग्मा हॉस्पिटलमधील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे यांनी सांगितले की, अवघ्या ४ ते ४.३० तासांत त्या अवयवांचे प्रत्यारोपण करावे लागते. एकाच शस्त्रक्रियेत तीन अवयव काढायचे असल्याने व सकाळी ७ वाजता विमानतळावरून मुंबईला विमान जाणार असल्याने मध्यरात्री दीड वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. रात्रभर सर्व डॉक्टर, कर्मचारी जागे होते. पहाटे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन कॉरिडोर (विनाअडथळा अॅम्ब्युलन्स जाण्याची सोय) करण्यात आली. तसा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पहाटे ४.५० मिनिटांनी किडनी घेऊन पहिली अॅम्ब्युलन्स धूत हॉस्पिटलकडे निघाली. समोर पोलिसांची वाहने होती. पहाटेची वेळ असल्याने मार्गावर रहदारी तुरळक होती. पोलिसांनी आधीच संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. पोलीस बंदोबस्तात अॅम्ब्युलन्स अवघ्या ६ मिनिटे ३० सेकंदांत धूत हॉस्पिटलमध्ये आली.
त्यानंतर सिग्मा हॉस्पिटलमधून एक किडनी व लिव्हर घेऊन दुसरी अॅम्ब्युलन्स ५ वाजून २० मिनिटांनी निघाली व चिकलठाणा विमानतळावर ५ वाजून २७ मिनिटांनी पोहोचली. ती थेट विमानाजवळ नेण्यात आली. तिथून विमानाद्वारे ते अवयव मुंबईला नेण्यात आले. धूत हॉस्पिटलमध्ये लगेच शस्त्रक्रिया करून संबंधित रुग्णावर किडनीचे यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांवर किडनी व लिव्हरचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. अशा रीतीने तीन रुग्णांना जीवदान मिळाले. नंतर सकाळी ९.१५ वाजेदरम्यान राम मगरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत नेण्यात आला. ११.३० वाजेदरम्यान मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
तिन्ही रुग्णांवर यशस्वी प्रत्यारोपण
राम मगरचे डाव्या किडनीचे धूत हॉस्पिटल येथील रु ग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले, तर मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटल येथील रुग्णावर यकृताचे, तर जसलोक हॉस्पिटलमधील रुग्णावर उजव्या किडनीचे प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
सिग्मा हॉस्पिटलसह या चारही ठिकाणी एकाच वेळी शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. आगामी तीन दिवसांमध्ये रुग्णांच्या प्रकृतीमधील सुधारणेबाबत कळून येईल, असे सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. उन्मेष टाकळकर यांनी सांगितले.
पुण्याचे काम...
एक बे्रन डेड रुग्ण चार जणांचे प्राण वाचवू शकतो. राम मगर यांच्या कुटुंबियांप्रमाणे इतरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. औरंगाबादेत यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा आहेत. अवयव दान करणे हे मोठे पुण्याचे काम आहे.
-डॉ. उन्मेष टाकळकर, सिग्मा हॉस्पिटल