समृद्धी महामार्ग होऊ नये ही मागणी नाही- उद्धव ठाकरे
By Admin | Updated: June 26, 2017 12:58 IST2017-06-26T12:58:21+5:302017-06-26T12:58:21+5:30
समृद्धी महामार्ग होऊ नये ही मागणी नाही, पण शेतकऱ्यांची काय मागणी आहे हे समजून घ्यावं लागेल.

समृद्धी महामार्ग होऊ नये ही मागणी नाही- उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 26- समृद्धी महामार्ग होऊ नये ही मागणी नाही, पण शेतकऱ्यांची काय मागणी आहे हे समजून घ्यावं लागेल. काही शेतकरी जमीन न देण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. तर काही शेतकरी त्यांच्या जमिनी देणार आहेत. या महामार्गासाठी सुपीक जमीनी जात आहे. त्यामुळे याबाबत अभ्यास करण्यासाठी मुंबईला बैठक घेतली जाईल, असं शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितलं आहे. समृद्धी महामार्ग विरोधात शेतकऱ्यांशी चर्चा करणार त्याचा अभ्यास करणार, महामार्गाचे टेंडर निघत आहे, भूसंपादन रक्कम देण्यासाठी अंतिम मसूदा तयार आहे. हे थांबविण्याबाबत सध्या तरी काही निर्णय नाही. पण मंत्री एकनाथ शिंदे व महामार्ग बाधित शेतकरी यांच्यात बैठक घेणार असल्याचं पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महामार्ग बाधित शेतकरींशी पळशी व माळीवाडा येथे संवाद साधला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे २५ जूनपासून नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर आहेत.
दरम्यान आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचं मोजून घेणार, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सरकारला दिला. तसेच वेळप्रसंगी शिवसेना समृद्धी महामार्ग विरोधात आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिला. कर्जमाफी ही फॅशन आहे, भाव दिला तरी रडतात साले, मोबाईल बिल भरण्यासाठी पैसे असतात पण कर्ज फेडायला तयार नसतात. असं म्हणून शेतकऱ्यांची हेटाळणी करणाऱ्यांना झुकविले आणि कर्जमाफी करायला लावली, असंही ते म्हणाले आहेत.
तसंच नगर, नाशिकमधील शेतकरी अद्यापही त्रस्त आहेत त्याबाबत अभ्यासगट स्थापन करण्याच्या सरकारला सूचना देणार असल्याचं उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. तसंच कर्जमाफीच्या आंदोलनात ज्या प्रमाणे शिवसेना कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला त्याच प्रकारे प्रत्येकाने आपापल्या गावातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती उपलब्ध करून द्यावी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शेतकरी आणि शिवसेना एकत्र आल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य झाली. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहिली आणि यापुढेसुद्धा राहिलं. शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या सूचनांचा आणि मागण्यांचा पाठपुरावा शिवसेना करणार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पण या आंदोलनादरम्यान पुणतांब्यातील ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते तातडीने मागे घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसंच नियमितपणे कर्ज परत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे त्या मदतीत वाढ केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेनेच्या पाठीशी शेतकरी आहेत त्यामुळे कर्जमुक्तीला फॅशन म्हणणाऱ्यांना कर्जमाफी करावीच लागली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना टोला लगावला आहे. जून 2016 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज राज्य सरकारने माफ केलं आहे पण आता जून 2017 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांचं कर्ज माफ करावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
औरंगाबादमधील संवाद यात्रेनंतर 29 जूनपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या सूचनांची आणि मागण्यांची माहिती घेतली जाणार आहे.