नव्या दुचाकीसोबत दोन हेल्मेट घेणे सक्तीचे

By Admin | Updated: February 9, 2016 00:33 IST2016-02-09T00:22:24+5:302016-02-09T00:33:27+5:30

औरंगाबाद : दुचाकी वाहन विक्रेत्यांनी खरेदीदारास दोन हेल्मेट पुरविण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार विक्रेत्यांनी

It is compulsory to take two helmets with a new bike | नव्या दुचाकीसोबत दोन हेल्मेट घेणे सक्तीचे

नव्या दुचाकीसोबत दोन हेल्मेट घेणे सक्तीचे


औरंगाबाद : दुचाकी वाहन विक्रेत्यांनी खरेदीदारास दोन हेल्मेट पुरविण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार विक्रेत्यांनी दुचाकी खरेदीदारास दोन हेल्मेट पुरविण्याची खातरजमा करण्यात यावी, विक्रेत्याने दोन हेल्मेट पुरविल्यासंबंधी पत्र दिलेले नसल्यास अशा दुचाकींची नोंदणी करण्यात येऊ नये, असे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहन निरीक्षकांना दिले आहेत.
अपघातांमध्ये दुचाकी वाहन चालविणाऱ्या व्यक्तीने व मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान केलेले असल्यास अपघाताची तीव्रता कमी होते. त्यामुळे ही बाब विचारात घेऊन तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन होण्याच्या दृष्टीने आणि कारवाई टाळण्यासाठी दुचाकी चालकांनी व मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे अनिवार्य करण्याचे परिवहन आयुक्तांनी सूचित केले आहे. तसेच दुचाकी विक्रेत्यांनी दोन हेल्मेट पुरविण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आरटीओ कार्यालयातर्फे शहरातील विक्रेत्यांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
विक्रेत्यांनी दोन हेल्मेट न पुरविल्यास अशा दुचाकींची नोंदणी करू नये, असे आदेशही मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
कारवाईची स्वतंत्र नोंद
विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर आरटीओ कार्यालयातर्फे कारवाई केली जात आहे. यामध्ये सोमवारपासून पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकींवरही कारवाई सुरू करण्यात आली. अशा कारवाईची माहिती मिळण्यासाठी त्याची स्वतंत्र नोंद करण्याची सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी केली आहे.
बंधपत्रानंतर लर्निंग लायसन्स
दुचाकी वाहन चालविण्यासाठी लर्निंग लायसन्स देताना अर्जदाराकडून हेल्मेट वापराविषयी बंधपत्र घेण्यात येणार आहे. हे बंधपत्र घेतल्यानंतरच अर्जदारास लायसन्स देण्यात यावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.

Web Title: It is compulsory to take two helmets with a new bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.