भवानी आॅटो पंपावरही मापात पाप
By Admin | Updated: June 24, 2017 23:54 IST2017-06-24T23:53:33+5:302017-06-24T23:54:39+5:30
औरंगाबाद :एपीआय कॉर्नर येथील भवानी आॅटो पंपावरही ग्राहकांना ३० मिली इंधन कमी देऊन मापात पाप केले जात असल्याचे शनिवारी समोर आले.

भवानी आॅटो पंपावरही मापात पाप
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अदालत रोडवरील चुन्नीलाल पेट्रोलपंपावर पाच लिटरमागे १५० मिलीपर्यंत इंधन ग्राहकांना कमी देण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर एपीआय कॉर्नर येथील भवानी आॅटो पंपावरही ग्राहकांना ३० मिली इंधन कमी देऊन मापात पाप केले जात असल्याचे शनिवारी समोर आले. ठाणे गुन्हे शाखा, वजन- मापे विभागाच्या अधिकारी आणि विविध पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या एकत्रित पथकाने ही तपासणी केली.
ठाणे आणि उत्तर प्रदेशातील कानपूर, लखनौ आदी शहरातील पेट्रोलपंपांच्या डिलिव्हरी मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चीप बसवून ग्राहकांना मापापेक्षा कमी इंधन दिले जात असल्याचे प्रकार नुकतेच उघडकीस आले. अशाच चीप औरंगाबादेतील पंपातही बसविण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी पकडलेल्या आरोपींनी दिली होती. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी रात्री शहरात दाखल झाले. पथकाने शुक्रवारी अदालत रोडवरील चुन्नीलाल पेट्रोलपंपाची तपासणी केली असता त्या पंपावर प्रती पाच लिटरमागे ग्राहकांना ५५ ते १५० मिली पेट्रोल, डिझेल कमी देण्यात येत असल्याचे समोर आले. वजन- मापे कार्यालयाने या पंपाला रात्री उशिरा सील ठोक ले.
शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पथक एपीआय कॉर्नर येथील भवानी आॅटो पंपावर धडकले. पंप सध्या भाडेतत्त्वावर व्यंकटेश काकडे, नूरभाई आणि अन्य एक जण चालवीत आहे. पंपावर सध्या दोन स्टॅण्डवरील आठ डिलिव्हरी पॉइंटद्वारे पेट्रोल -डिझेलची विक्री सुरू होती.
सर्व डिलिव्हरी पॉइंटची पोलीस आणि वजन- मापे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, तपासणीत सर्वच पॉइंटमधून ग्राहकांना प्रती पाच लिटरमागे सरासरी २० ते ३० मिली इंधन कमी दिल्या जात असल्याचे समोर आले.
आजच्या कारवाईत पोनि. घोडके, पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अंकुश भोसले, सुरेश यादव, प्रशांत भुरके, संतोष सुर्वे, वजन- मापे विभागाचे निरीक्षक ए. एस. कुलकर्णी, शिवहरी मुंडे, अशोक शिंदे, पेट्रोलियम कंपनीच्या सेल्स मॅनेजर अपेक्षा भदोरिया, रंजन पांडे, विपुल वर्मा आणि तंत्रज्ञांनी सहभाग घेतला. शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय बहुरे यांचेही पथक यावेळी उपस्थित होते.
दिल्लीगेट पेट्रोलपंपाचीही तपासणी
ठाणे गुन्हे शाखा आणि शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वजन- मापे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री दिल्लीगेट येथील पेट्रोलपंपाची तपासणी केली. तेथील दहा नोजलच्या माध्यमातून यांत्रिकी आणि मानवीय पद्धतीने इंधनाचे मोजमाप करण्यात आले. पंपावरील सर्व डिलिव्हरी पॉइंटमधून पाच लिटर इंधनामागे १५ ते १७ मिलीलिटर इंधन कमी मिळत असल्याचे आढळले. नियमानुसार २० मिलीलिटरपर्यंत कमी-जास्त इंधनाची तीव्रता असू शकते. यामुळे या पंपावर आक्षेपार्ह असे काहीच आढळले नसल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. शिवाय भवानी आॅटो पंपावर ३५ मिलीलिटर इंधन कमी आढळले. मात्र हा नोजलचा दोष आहे अथवा अन्य काही याबाबतची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंपावरील मापाने मोजणी नाही
पेट्रोलपंपावरील इंधन मोजण्यासाठी प्रमाणित मापाने इंधन मोजण्यास पोलिसांनी नकार दिला. पंपावरील प्रमाणित माप असताना पथकाने सोबत आणलेल्या मापानेच इंधनाचे मापन केले. पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी दर तीन महिन्यांनी पंपावर जाऊन ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या मापाची तपासणी करतात. त्यांना कधीच मापात त्रुटी आढळल्या नव्हत्या, हे मात्र विशेष.