विविध योजनांच्या कामात अनियमितता
By Admin | Updated: August 7, 2014 01:36 IST2014-08-07T01:17:30+5:302014-08-07T01:36:57+5:30
जालना: जिल्हा परिषदेतंर्गत बांधकाम, लघुसिंचन, कृषी व समाजकल्याण विभागाने २०१२- १३ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर

विविध योजनांच्या कामात अनियमितता
जालना: जिल्हा परिषदेतंर्गत बांधकाम, लघुसिंचन, कृषी व समाजकल्याण विभागाने २०१२- १३ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा ठपका औरंगाबाद येथील मुख्य लेखापरिक्षक स्थानिक निधी (लेखा) यांनी ठेवला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघुसिंचन, कृषी, समाजकल्याण या प्रमुख विभागांनी मोठ्या प्रमाणावर कामे केली. या कामातील काही गोष्टींवर लेखा परिक्षण अहवालातून काहीसा गंभीर व क्षुल्लक कारणांवरून सुद्धा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. लेखा परिक्षणात तो अहवाल ९ जुलै रोजी जिल्हा परिषदेत सादर करण्यात आला. या तपशीलवार अहवालातून या विभागातंर्गत काही अनियमिततेबाबत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत पाझर तलावांच्या कामांबाबत काहीसे गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. तर काही कामांबाबत क्षुल्लक गोष्टीतून सुद्धा ठपका ठेवण्यात आला आहे. हसनाबाद, शिरसगाव, गोषेगाव, जैनपूर, खंडाळा, दाभाडी, लालवाडी, बोरगाव येथील पाझर तलावांच्या कामांबाबत लेखा परिक्षणातून ताशेरे ओढण्यात आले आहेत. विशेषत: मोजमाप पुस्तिकेतील नोंदींबाबत हे आक्षेप आहेत. या विभागाने खरेदी केलेल्या स्टील खुर्च्यांत अनियमितता झाल्याचे नमूद करण्यात आले असून शिरसगाव वाघ्रुळ येथील कोल्हापुरी बंधारा दुरूस्ती, बेथलम, वानडगाव, गोलापांगरी, गाढे सावरगाव, लोणार भायगाव येथील तलावाच्या कामात अनियमितता दाखविण्यात आली आहे. लघुसिंचनाच्या सर्वेक्षणासह पाझर तलावातील मासेमारी व अन्य कामांबाबतही आक्षेप आहेत.
कृषी विभागाच्या वखर पुरवठा, नॅब सॅक फवारा, कडबाकुडी यंत्र, साधा फवारा, ताडपत्री पुरवठा, पंपसंच पुरवठा, बायोगॅस सहयंत्र अनुदान, बैलजोडी खरेदी यासह विहिरींच्या बांधकामाबाबत संबंधित पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवरही या अहवालातून ताशेरे ओढण्यात आले आहेत.
समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती, परीक्षा शुल्क, विद्यावेतन वितरणावरही आक्षेप नोंदविण्यात आले असून आंतरजातीय प्रोत्साहनपर अनुदान, दलितवस्ती सुधार योजना, वृद्ध कलाकार मानधनासह अन्य बाबींवरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
पशुसंवर्धन विभाग, सामान्य प्रशासन तसेच वित्त विभागाच्याही काही गोष्टींवर आक्षेप घेतल्या गेले आहेत. बांधकाम विभागाच्या काही कामांबाबत गंभीर आक्षेप आहेत. मौजे लेहा अंतर्गत सिमेंट रोड बांधकामात अनियमितता झाल्याचे लेखा परिक्षणातून निष्पन्न झाले असून, लालवाडी प्राथमिक शाळेतील पाच खोल्यांच्या दुरुस्तीचे काम, तांदूळवाडी खुर्द येथील प्राथमिक शाळेच्या दोन खोल्यांची दुरुस्ती, दुधना काळेगाव प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती मोजे, बुटखेडा तांडा येथील सभामंडप, रोषणगाव (ता. बदनापूर) येथील आयुर्वेद रुग्णालयाची संरक्षण भिंत, सरफगव्हाण ते माहेर जवळा तांडा रस्त्याचे बांधकाम, कानखेडा येथील रस्त्याचे काम, अरगडे गव्हाण ते पाडळी रस्त्याचे काम, कस्तुरवाडी येथील जोडरस्ता शिरसगाव मंडप, येथील रस्त्याच्या पॅसेजचे काम, दावतपूर ते बाभूळगाव रस्त्याचे काम, धारकल्याण जोड रस्त्याची डागडुजी, तनवाडी ते मांदळा रस्त्याचे बांधकाम, मोजे आव्हाना येथील शाळेच्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती मौजे खासगाव येथील सिमेंट काँकेटचा रस्ता व बांधकाम व मौजे मसला येथील सिमेंट काँके्रट रस्ता व नाली दुरुस्ती,मोजे खापरखेडा येथील नालीबांधकाम, रवनापूर येथील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, मौजे वडाळा येथील अंगणवाडी बांधकाम, डाहके वाडी येथील अंगणवाडी बांधकाम, सिपोरा येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम, जाफराबाद येथील नवनिर्मित पंचायत समिती इमारतीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमतता झाली असल्याचे या अहवालातून म्हटले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपमुख्य लेखा परिक्षक स्थानिक निधी लेखा यांनी दिलेल्या लेखा परिक्षणाच्या अहवालास मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विविध विभागातील आक्षेपांवर प्रशासनाने अनुपालन केले जाईल, असे एका ओळीचे उत्तर ठरावाद्वारे सादर केले आहे. यातील बहुतांशी आक्षेप हे किरकोळ स्वरूपाचे व प्रशासकीय कामकाजातील त्रुटीचा भाग असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
४जिल्हा परिषदेच्या ३१ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या लेखा परिक्षणासंबंधीचा विषय विषयपत्रिकेत होता. मात्र सभेत कोणत्याही विषयावर चर्चा होऊ न शकल्याने सत्ताधारी सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मंजूर...मंजूर च्या घोषणा देत सर्व विषय मंजूर केले.