धारूर-वडवणी रस्ता खचल्याने अपघातास निमंत्रण
By Admin | Updated: July 13, 2014 00:17 IST2014-07-12T23:54:34+5:302014-07-13T00:17:38+5:30
धारूर : धारूर ते वडवणी रस्त्यावर पहाडी दहिफळ जवळ दोन महिन्यांपूर्वीच केलेला रस्ता खचून गेला आहे. आणखी एखादा मोठा पाऊस झाला तर या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

धारूर-वडवणी रस्ता खचल्याने अपघातास निमंत्रण
धारूर : धारूर ते वडवणी रस्त्यावर पहाडी दहिफळ जवळ दोन महिन्यांपूर्वीच केलेला रस्ता खचून गेला आहे. आणखी एखादा मोठा पाऊस झाला तर या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या रस्त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे, हे पहिल्याच पावसात समोर आल्याने सा.बां. विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वडवणी, धारूर या दोन तालुक्यांना जोडणारा एक मुख्य रस्ता आहे. या मार्गावरील वाहनांची वर्दळ पाहता या रस्त्याची दोन महिन्यांपूर्वीच दुरूस्ती करण्यात आली होती. सा.बां. उपविभागाने दोन महिन्यांपूर्वीच धारूर हद्दीतील रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र पहिल्या पावसातच दहिफळजवळ दोन ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे खचून गेला आहे. हा रस्ता खचल्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. आणखी एखादा मोठा पाऊस झाला तर हा रस्ता मोठ्या प्रमाणावर खचून या मार्गावरील वाहतूक बंद पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या रस्त्याची दुरूस्ती करून होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी श्रीराम मुंंडे, सुरेश अंडील यांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अभय देशमुख म्हणाले, हा रस्ता किती आणि कसा खचला आहे, याची आम्ही पाहणी करू. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने लवकरात लवकर हा रस्ता दुरूस्त केला जाईल. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल़(वार्ताहर)
संपर्क तुटू शकतो़़़
धारुर ते वडवणी रस्त्यादरम्यान पारगाव, दहिफळ, चारदरी, चिंचवण, धारूर, आदी गावांचा संपर्क होतो़ हा रस्ता दुरुस्त न झाल्यास वरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे़