गुंतवणूकदार, एजंट हवालदिल
By Admin | Updated: July 18, 2014 01:54 IST2014-07-18T01:27:36+5:302014-07-18T01:54:18+5:30
औरंगाबाद : नाशिकच्या केबीसी या संस्थेने केलेला घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर आता या संस्थेत पैसे गुंतविणारे शहरातील ठेवीदार आणि एजंटही हवालदिल झाले आहेत.

गुंतवणूकदार, एजंट हवालदिल
औरंगाबाद : नाशिकच्या केबीसी या संस्थेने केलेला घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर आता या संस्थेत पैसे गुंतविणारे शहरातील ठेवीदार आणि एजंटही हवालदिल झाले आहेत. बजाजनगर, वाळूज एमआयडीसी परिसरातील काही एजंट गुरुवारी संस्थेविरुद्ध तक्रार देण्यासाठी गुन्हे शाखेत आले होते.
केबीसी या संस्थेने गुंतवणुकीवर कमी दिवसांमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यभरात विशेषत: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले होते. आता संस्थाचालकांनी गोरगरीब गुंतवणूकदारांचे पैसे हाडपून गाशा गुंडाळला आहे. फसल्या गेलेल्या काही एजंटांनी आत्महत्या केल्याने हे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. या संस्थेत औरंगाबादेतील शेकडो नागरिकांनी पैसे गुंतविलेले आहेत. शिवाय संस्थेचे औरंगाबादेत अनेक एजंटही आहेत.
त्यामध्ये बजाजनगर, वाळूज एमआयडीसी परिसरातील विजय एकलुरे, सूर्यकांत दुधाटे या दोघांनी केबीसीमध्ये तब्बल ७० लाख रुपये गुंतविलेले आहेत.
उत्तम जाधव यांनी २५ लाख, विजय तांदळे यांनी ६ लाख, वैजिनाथ गुुंडेवार यांनी साडेसात लाख रुपये भरलेले आहेत. तर बजाजनगर परिसरातीलच एजंट असलेल्या आत्माराम जगताप यांच्यामार्फत परिसरातील तब्बल दीडशे मेंबर्सनी कोट्यवधी रुपये केबीसीकडे भरलेले आहेत. हवालदिल झालेले हे सर्व जण गुरुवारी सकाळी केबीसीविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस आयुक्तालयात आले होते; परंतु बंदोबस्तामुळे पोलीस आयुक्तालयात कुणीच वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे या लोकांची तक्रार घेण्यात आली नाही.
औरंगाबाद पोलिसांचाही हलगर्जीपणाच!
केबीसीने जानेवारी महिन्यात एजंट आणि गुंतवणूकदारांचा औरंगाबादेत मेळावा घेतला होता. मेळाव्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी ही कंपनी फसवी आहे, ती नागरिकांची कशी फसवणूक करीत आहे, याचा अहवाल सीआयडीला सादर केला होता; परंतु मेळाव्याच्या दिवशीच गुन्हे शाखा पोलिसांनी केबीसीच्या संचालकांना ताब्यात घेतले.
काही वेळ चर्चा झाली आणि नंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात जमावबंदी कलमाचे उल्लंघन केल्याची किरकोळ कारवाई करून औरंगाबाद पोलिसांनी या संचालकांना सोडून दिले. त्याच वेळी औरंगाबाद पोलिसांनी या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असता तर अनेक गोरगरिबांची फसवणूक टळली असती. शिवाय संचालकाला फरार होण्याची संधीच मिळाली नसती, हे विशेष.