‘जलयुक्त’ची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी
By Admin | Updated: May 14, 2017 23:04 IST2017-05-14T23:01:12+5:302017-05-14T23:04:19+5:30
लातूर : जलयुक्त शिवार अभियान कामाची त्रयस्थ संस्थेमार्फत क्रॉस तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

‘जलयुक्त’ची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : शासनाने सन २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केले. या अभियानांतर्गत वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ९१ कोटी ३५ लाखांची कामे पूर्ण करण्यात आली. दरम्यान, या कामाची त्रयस्थ संस्थेमार्फत क्रॉस तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
गेल्या तीन वर्षांतील दुष्काळामुळे जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागले. त्यामुळे गतवर्षी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. पाणीटंचाईचे चटके सोसलेल्या नागरिकांना जलसंधारणाचे महत्व समजले. दरम्यान, शासनाने पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी सन २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली. या अभियानांतर्गत पहिल्या वर्षी २०२ गावांची निवड करण्यात आली होती. शासकीय निधी व लोकवाट्यातून जिल्ह्यात २०० कोटी ४६ लाखांची कामे झाली. शासकीय निधी ९१ कोटी ३५ लाखांचा तर लोकवाटा हा ९९ कोटी ११ लाखांचा होता. या अभियानाअंतर्गत माती नालाबांध, कंपार्टमेंट, बल्डिंग, शेततळे यासह कंपार्टमेंट बल्डिंग, सिमेंट बंधारा व दुरुस्ती अशी कामे करण्यात आली.