आठवड्यात १५ गुन्ह्यांचा तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:53 IST2017-10-04T00:53:46+5:302017-10-04T00:53:46+5:30
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात चो-या, दरोडे, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातील १५ गुन्ह्यांचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाला यश आले

आठवड्यात १५ गुन्ह्यांचा तपास
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात चो-या, दरोडे, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातील १५ गुन्ह्यांचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाला यश आले आहे. यामध्ये १२ सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून सात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. चोरी, घरफोडी, दरोडा, गोळीबार, लूटमार अशा घटना सर्रासपणे घडत आहेत. याचा तपास लावून जनतेचा विश्वास जिंकण्याचे मोठे आव्हान बीड पोलिसांसमोर असणार आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असून आतापर्यंत केवळ आठवडाभरात १५ गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक पोलीस, दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये १२ सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बीड तालुक्यातील नेकनूर येथे मागील महिन्यात सलग चोºया आणि घरफोड्या झाल्या होत्या. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हाच धागा पकडून स्थागुने नेकनूरच्या गुन्ह्यांत गांभीर्याने लक्ष घालत सातही गुन्ह्यांचा छडा लावला. त्यानंतर माजलगाव शहरातील तीन, माजलगाव ग्रामीणमधील एक तर बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले. या गुन्हेगारांकडून सोने व रोख असा सात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि श्रीकांत उबाळे, दिलीप तेजनकर, सचिन पुंडगे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने केली. दोन्ही पथकाच्या कर्मचा-यांनीही विशेष परिश्रम घेतले.