कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट चोरीचा तपास थंड बस्त्यात
By Admin | Updated: July 28, 2014 00:57 IST2014-07-28T00:14:20+5:302014-07-28T00:57:58+5:30
फकिरा देशमुख, भोकरदन भोकरदन - जाफराबाद तालुक्यात १२ कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांचे ३५० लोखंडी दरवाजे चोरीला जाऊन दोन वर्ष झाली.
कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट चोरीचा तपास थंड बस्त्यात
फकिरा देशमुख, भोकरदन
भोकरदन - जाफराबाद तालुक्यात १२ कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांचे ३५० लोखंडी दरवाजे चोरीला जाऊन दोन वर्ष झाली. अद्यापही या भागातील लोकप्रतिनिधींनी संबंधित दरवाजे बसविण्यासाठी कोणताही पाठपुरावा न केल्यामुळे जमासाठा होण्याऐवजी वाहून जात आहे. याची चिंता ना लोकप्रतिनिधींना न संबंधित विभागाला आहे.
भोकरदन तालुक्यात कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमावरून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ़ चंद्रकांत दानवे व बदनापूरचे आ़ संतोष सांबरे यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी सुरु आहे. मात्र ज्या नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमावरून पुढारी भांडत आहेत. त्याच नद्यावरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे तब्बल ४०० दरवाजे चोरीला गेले आहेत. त्यामध्ये पाणीसाठा होत नाही. त्या बंधाऱ्याचे दरवाजे बसविण्यासाठी या लोकप्रतिनिधींना वेळ नाही अशी परिस्थिती आहे. दोन्ही दानवे व संतोष सांबरे यांनी वजीरखेडा, सिरसगाव मंडप, गोकुळ जाफराबाद तालुक्यातील सावंगी वरगणे, मेरखेडा येथील कोल्हापुरी बधांऱ्याचे एकूण ४०० लोखंडी दरवाजे गेल्या वर्षी चोरीला गेले आहेत. या प्रकणात जाफराबाद व हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर सिरसगाव मंडप प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांनी तक्रार देऊन मोकळे झाले. चोरी गेलेल्या एका दरवाजाचे वजन हे १ क्विंटलपर्यंत आहे. जर ३५० दरवाजे चोरीला जाईपर्यंत पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचारी किंवा या परिसरातील शेतकऱ्यांना कसे कळाले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदरील दरवाजे चोरी प्रकरणाशी या खात्यातील कोणाचा वरदहस्त आहे काय कारण ट्रक शिवाय दरवाजे घेऊन जाणे शक्य नाही, असे असताना सुध्दा पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल करून घेतले व फाईल बंद केली, असाच प्रकार म्हणावा लागणार आहे. सदरील चोरी गेलेल्या दरवाज्यांचा तपास लावावा किवा नवीन दरवाजे बसविण्यासाठी रावसाहेब दानवे, आ़ चंद्रकांंत दानवे, आ़ संतोष सांबरे यांनी काही प्रयत्न केले का सवाल जनतेतून व्यक्त होत आहे. जर दरवाजाचा शोध लागत नसेल तर पाटबंधारे विभागाने फायबर दरवाजासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला या नेत्यांनी आतापर्यंत का पाठपुरावा करून दरवाजे मंजूर करून आणले नाही. कारण जर हे नेते नवीन तीन कोल्हापुरी बंधारे मंजूर करुन आणल्याच्या श्रेयासाठी भांडत आहेत. तर या तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांना नवीन दरवाजे मंजूर करून घेण्यासाठी का भांडत नाहीत.या तीन नेत्यांपैकी चंद्रकांत दानवे हे राज्यातील सत्ताधारी आमदार आहेत. त्यांनी सुध्दा या बंधाऱ्यात पाणीसाठा होण्यासाठी काही काय केले हे जनतेसमोर सांगण्याची गरज आहे.
दुर्लक्ष कायम...
केवळ निवडणुका आल्या म्हणून आपणच विकासाची कामे केली म्हणून जनतेला भूलथापा मारून मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी या नेत्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे.