जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी करा
By Admin | Updated: December 13, 2014 00:29 IST2014-12-13T00:17:48+5:302014-12-13T00:29:00+5:30
औरंगाबाद : कथित गैरव्यवहारप्रकरणी दोषींना पाठीशी घातल्याप्रकरणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधितांची चौकशी करावी, असे आदेश खंडपीठाने शासनाला दिले आहेत.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी करा
औरंगाबाद : संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असलेल्या आपेगाव (ता. पैठण) येथील विविध विकास योजनांची अंमलबजावणी करताना झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी दोषींना पाठीशी घातल्याप्रकरणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधितांची चौकशी करावी, असे आदेश खंडपीठाने शासनाला दिले आहेत.
पैठण तालुक्यातील आपेगाव येथील ग्रामपंचायतीमार्फत यशवंत ग्रामसमृद्धी योजनेसह अन्य योजना राबविण्यात आल्या. या योजनांची अंमलबजावणी करताना झालेल्या कथित अपहाराची चौकशी करावी, अशी याचिका अण्णासाहेब औटे यांनी अॅड. प्रदीप देशमुख यांच्यामार्फत न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका न्यायमूर्ती बी.पी.धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती ए.एम. बदर यांच्यासमोर सुनावणीसाठी आली असता याचिकाकर्त्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला की, हा गैरव्यवहार झाला तेव्हा कैलास औटे हे ग्रामपंचायतीचे सरपंच होते. ते सध्या पंचायत समिती सदस्य आहेत. त्यांच्यामुळे या प्रकरणाची योग्य चौकशी होत नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाची चौकशी केल्याचे शपथपत्र न्यायालयात दाखल केले; मात्र हा चौकशीचा फार्स आहे. गटविकास अधिकारी आणि अन्य दोषींवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी करीत असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे नमूद करीत वरीलप्रमाणे निर्देश दिले. या याचिकेत अॅड. देशमुख यांना अॅड. सचिन जोशी, अॅड. यशोदीप देशमुख आणि अॅड. योगेश देशमुख यांनी साहाय्य केले.