अवैध वाळू वाहतूक बंद
By Admin | Updated: September 12, 2014 00:31 IST2014-09-12T00:14:05+5:302014-09-12T00:31:58+5:30
वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्यामुळे वाळू वाहतूक बंद झाली आहे.

अवैध वाळू वाहतूक बंद
पाचोड : औरंगाबाद ग्रामीणचे शिकाऊ पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब शिंदे यांनी पाचोड व परिसरातील अंतर्गत रस्ते पिंजून काढून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्यामुळे वाळू वाहतूक बंद झाली आहे.
पाचोड परिसरातील हिरडपुरी, टाकळी अंबड, आवडे उंचेगाव, नवगाव आदी गावांच्या शिवारातून गोदावरी नदीचे पात्र नांदेडपर्यंत गेले आहे. या गोदावरी पात्रातून दररोज क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात बेसुमार वाळू वाहतूक होत आहे.
या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पाचोड पोलीस हलगर्जीपणा करीत असल्यामुळे औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी शिकाऊ पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी पाठविले.
त्यामुळे अण्णासाहेब जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पाचोड व परिसरात तळ ठोकला व राष्ट्रीय महामार्गावरून व आडमार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक, एलपी ट्रक, ट्रॅक्टरवर कारवाई केली, तर काही वाळू माफियांवर गुन्हे दाखल केले.
पैठणचे तहसीलदार संजय पवार यांनीसुद्धा आपले सहकारी सोबत घेऊन पाचोड परिसरात येऊन २५ वाहनांवर कारवाई केली आहे. या धडाकेबाज कारवाईचे सरपंच अंबादास नरवडे यांनी स्वागत केले आहे. (वार्ताहर)