सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात टेक्स्टाईल पार्क आणणार

By Admin | Updated: October 11, 2014 00:40 IST2014-10-11T00:30:57+5:302014-10-11T00:40:13+5:30

औरंगाबाद : पुढील पाच वर्षांच्या काळात तालुक्यात औद्योगिक वसाहत उभी करण्यासंदर्भात मी प्रयत्न करणार असल्याची भूमिका अब्दुल सत्तार यांनी मांडली.

To introduce Textile Park in Silode-Soowa Nagar constituency | सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात टेक्स्टाईल पार्क आणणार

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात टेक्स्टाईल पार्क आणणार

औरंगाबाद : सिल्लोडमध्ये मका प्रक्रिया उद्योग आणला तो येत्या काही दिवसांत उभा राहील. पुढील पाच वर्षांच्या काळात तालुक्यात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभी करण्यासंदर्भात मी प्रयत्न करणार असल्याची भूमिका अब्दुल सत्तार यांनी मांडली.
‘विकासाचा झंझावात; काल- आज- उद्या’ या आपल्या जाहीरनाम्यासंदर्भात बोलताना अब्दुल सत्तार यांनी मागील पाच वर्षांच्या आपल्या मतदारसंघात केलेल्या कामांचा आढावा घेतला. त्याचबरोबर येत्या पाच वर्षांत काय कामे करणार याचा संकल्पही स्पष्ट केला.
जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या असलेल्या तालुक्यात एखादी मोठी औद्योगिक वसाहत असल्यास या परिसराचा आणखी विकास होण्यास मदत होईल, असे वाटते.
या दृष्टीनेचे सोलापूर- भुसावळ हा रेल्वेमार्ग अजिंठ्याहून जावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. अशी औद्योगिक वसाहत उभी राहिल्यास माझ्या सिल्लोड आणि सोयगाव या मतदारसंघासह भोकरदन, फुलंब्री, कन्नड या तालुक्यांनाही फायदा होईल. पाच हजार एकर जमिनीवर ही वसाहत उभी राहावी यासाठी माझे प्रयत्न असतील.
माझ्या मतदारसंघात सत्तर कोटी रुपयांचा मका प्रक्रिया उद्योग मी आणला आहेच. दहा कोटी रुपये निधी मिळाला आहे. या उद्योगामुळे शेतकऱ्यांना मोठी संजीवनी मिळेल. हा प्रकल्प मी सहकाराच्या नव्हे, तर सरकारच्या माध्यमातून उभा केला आहे. मक्याचे पीक तीन महिन्यांचे असते. हा प्रकल्प यशस्वी झाला तर शेतकरी वर्षात दोन पिके घेऊन अधिक सुखी होईल. मतदारसंघात टेक्स्टाईल पार्क उभारण्याचाही माझा प्रयत्न राहणार आहे.
यासंदर्भात सिद्धेश्वर सूतगिरणीचे चेअरमन असलेल्या प्रभाकर पालोदकर यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. वस्त्रोद्योगमंत्र्यांशीही एक बैठक झाली आहे. सिद्धेश्वर सूतगिरणीकडे असलेला काही निधी या कामी येईल.
राम-रहीम कॉम्प्लेक्स ही तर राज्यातील एक आदर्श अशी योजना आहे. राज्यात कुठेच एका ठिकाणी एक हजार गाळे नसतील, असा दावा अब्दुल सत्तार यांनी यावेळी केला. या कॉम्प्लेक्समुळे व्यापार व्यवसायाला चालना मिळेल. शिवाय रोजगाराच्या संधीही मिळणार आहेत.
मतदारसंघातील विविध धार्मिक क्षेत्रांचा विकास करण्यावरही मी भर दिल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. केळगाव येथील मुर्डेश्वर मंदिराला दोन कोटी रुपये निधी दिला. उंडणगाव येथील बालाजी मंदिर तसेच विविध हेमाडपंती मंदिरांकडे जाण्यासाठी उत्कृष्ट रस्ते तयार
केले.
बौद्ध समाजासाठी शहरात बुद्धविहार उभे केले. ६७ गावांमध्ये दलित बांधवांसाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी खर्च केला. सिल्लोडमध्ये डोळ्यांसाठी शस्त्रक्रिया कॅम्प मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले. महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू होत आहे. हे सर्व करीत असताना ‘सर्वांसोबत आणि सर्वांसाठी’ हेच आपले ब्रीद असल्याचे ते म्हणाले.

Web Title: To introduce Textile Park in Silode-Soowa Nagar constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.