चारही मतदारसंघासाठी शिवसेनेकडून मुलाखती
By Admin | Updated: September 17, 2014 01:13 IST2014-09-17T00:46:56+5:302014-09-17T01:13:03+5:30
उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून महायुतीतील तिढा वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमिवर मंगळवारी शिवसेनेनेही ‘एकला चलो’ म्हणत जिल्ह्यातील चारही विधानसभा

चारही मतदारसंघासाठी शिवसेनेकडून मुलाखती
उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून महायुतीतील तिढा वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमिवर मंगळवारी शिवसेनेनेही ‘एकला चलो’ म्हणत जिल्ह्यातील चारही विधानसभा निवडणूकीसाठी इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या. उस्मानाबादसह तुळजापूर मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक असल्याचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी सांगितले असून, परंडा मतदारसंघातही शिवसेनेत तिकिटासाठी मोठी चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे या मुलाखती पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र आघाडीसह महायुतीच्या जागा वाटपाचे भिजत घोंगडे कायम आहे. जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु असतानाच मंगळवारी शिवसेनेने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी मुंबई येथे मातोश्रीवर मुलाखती घेतल्या. त्यामुळे युती तुटण्याची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये शिवसेनेच्या तालुकानिहाय बैठका, मेळावे झाले आहेत. बहुतांश बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाही शिवसेना-भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्षातील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. असे असतानाच मागील सात ते आठ दिवसांमध्ये सेनेसोबतच भाजपातील काही नेते ‘स्वबळा’वर भर देताना दिसत होते. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही संभ्रमात आहेत. युती राहणार की तुटणार या चर्चेला जिल्हाभरात उधाण आलेले असतानाच मंगळवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा. चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील इच्छुकांच्या या मुलाखती पार पडल्या.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या भूम-परंडा-वाशी मतदार संघातील इच्छुकांची भाऊगर्दी अधिक होती. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शंकरराव बोरकर, प्रा. तानाजी सावंत आणि मुंबई येथील एका उद्योजकाने या मतदारसंघासाठी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे येथे तिकीटासाठी मोठी रस्सीखेच असल्याचे चित्र आहे. शिवसेना स्वतंत्र लढल्यास परंडा मतदारसंघात भाजपा कोणाला उतरविणार याचीही उत्सुकता वाढली आहे. कळंब-उस्मानाबाद या मतदारसंघावर सध्या शिवसेनकडे आहे. येथून विद्यमान आमदार ओम राजेनिंबाळकर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरत आहेत. मात्र मंगळवारी शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनीही उस्मानाबादसह तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त करीत मुलाखत दिली आहे.
उमरगा विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. चौगुले यांनी एकट्यानेच मुलाखत दिल्याने त्यांचा उमेदवारीचा मार्ग सुकर असल्याचे बोलले जात आहे. भाजपाकडे असलेल्या तुळजापूर मतदार संघासाठीही मुलाखती घेण्यात आल्या. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी या जागेसाठी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे यापैकी कोणाला उमेदवारीची लॉटरी लागते हे पहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
उस्मानाबाद : सेना-भाजपा स्वबळ आजमावण्याच्या मुडमध्ये असताना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही बिघाडीच्या मार्गाने जात असताना मनसेनेही पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. तुळजापूर मतदारसंघासाठी अमर कदम, पाशा शेख, राहुल बचाटे, राजेश मलबा, एस.के. जहागिरदार यांनी मुलाखती दिल्या. तर उस्मानाबाद-कळंब मतदार संघासाठी अॅड. अमोल वरुडकर, संजय यादव, बाबा कोठावळे हे इच्छुक आहेत.
दुधगावकरांची जय्यत तयारी
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीची मोर्चेबांधणी सुरु असताना काँग्रेसचे जि.प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातून लढण्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केल्याचे सांगितले जात असून, दुधगावकर विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास उस्मानाबादची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने दुधगावकर पत्रकार परिषद घेवून लवकरच जाहीर घोषणा करणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यातून सांगण्यात येत आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, चारही मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्याचे सांगत, जिल्ह्यात शिवसेना स्वबळावर लढण्यासाठीची पक्षाची संपूर्ण तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.