शिवसेना इच्छुकांच्याही मुंबईत मुलाखती
By Admin | Updated: September 17, 2014 00:26 IST2014-09-17T00:23:19+5:302014-09-17T00:26:11+5:30
नांदेड : नांदेड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारासाठी माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार अनुसयाताई खेडकर यांच्यासह दोन्ही जिल्हाप्रमुख मैदानात उतरले आहेत़

शिवसेना इच्छुकांच्याही मुंबईत मुलाखती
नांदेड : नांदेड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारासाठी माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार अनुसयाताई खेडकर यांच्यासह दोन्ही जिल्हाप्रमुख मैदानात उतरले आहेत़ सेनेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीवर मुलाखती सुरू असून नांदेडातील इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक मुंबईत तळ ठोकून आहेत़
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या वाढतच चालल्याचे दिसत आहे़ त्याचवेळी यातील अनेक इच्छुकांकडून आपली बाजू कशी वरचढ आहे, हे दाखविण्यासाठी इतरांच्या कमकुवत बाजू पक्षापुढे ठेवल्या जात आहेत़ त्याचवेळी स्पर्धकांचा मागील निवडणुकातील परफॉरमन्स पक्षप्रमुखांपुढे ठेवला जात आहे़ नांदेड उत्तर मतदारसंघातून माजी खासदार वानखेडे, माजी आमदार श्रीमती खेडकर यांच्यासह जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, माजी महापौर सुधाकर पांढरे, बंडू खेडकर यांनी उमेदवारी मागितली आहे़ त्याचवेळी डॉ़ सुनील कदम यांच्याकडूनही उत्तरेतील उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात आहेत़
नांदेड दक्षिणमध्ये २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावे लागलेले सेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, मनपातील विरोधी पक्षनेते दीपक रावत, जिल्हा परिषद सदस्या वच्छलाताई पुयड, बालाजी पुयड, बाळू खोमणे यांनी मुलाखत देवून उमेदवारीसाठी दावा केला आहे़ त्यात विष्णूपुरी येथील डॉ़ संतुकराव हंबर्डे यांनीही ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेताना शिवसेनेचा शिवबंध धागा मनगटावर बांधला आहे़ त्यांचे नावही नांदेड दक्षिण मतदारसंघातील उमेदवारीसाठी पुढे आले आहे़
वच्छलाताई पुयड यांच्यासह बालाजी पुयड यांच्याशी उमेदवारीसाठी स्पर्धा करताना आता आणखी एक स्पर्धक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांच्यापुढे उभा राहिला आहे़ शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित डॉ़ हंबर्डे यांच्या सेना प्रवेशाने सेनेतील उमेदवारीची स्पर्धा चुरशीची झाली आहे़
दरम्यान, विद्यापीठात उपकुलसचिव असलेले हंबर्डे यांच्या सेना प्रवेशाबाबत कुलगुरू डॉ़ विद्यासागर म्हणाले, त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत परवानगी मागणारे पत्र विद्यापीठाला दिले आहे़ याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे़ (प्रतिनिधी)