युवक काँग्रेसच्या इच्छुकांच्या विधानसभेसाठी मुलाखती

By Admin | Updated: September 8, 2014 00:33 IST2014-09-08T00:22:59+5:302014-09-08T00:33:55+5:30

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद विधानसभेच्या निवडणुकीत युवकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याच्या जोरदार हालचाली काँग्रेसच्या गोटात सुरू आहेत.

Interviews for Legislative Assembly of Youth Congress | युवक काँग्रेसच्या इच्छुकांच्या विधानसभेसाठी मुलाखती

युवक काँग्रेसच्या इच्छुकांच्या विधानसभेसाठी मुलाखती

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद
विधानसभेच्या निवडणुकीत युवकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याच्या जोरदार हालचाली काँग्रेसच्या गोटात सुरू आहेत. त्यासाठी युवक काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती शुक्रवारी दिल्लीत घेण्यात आल्या. राज्यातून तब्बल ५२ इच्छुकांनी या मुलाखतींना हजेरी लावून उमेदवारीवर दावा केला.
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी सांगितले की, नव्या व तरुण चेहऱ्यांना संधी देण्याच्या उद्देशाने युवक काँग्रेसच्या सदस्यांना यावेळेस विधानसभा निवडणुकीत उतरविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने युवक काँग्रेसतर्फे एक पाहणीही करण्यात आली होती. त्यात २५ मतदारसंघांतून युवक काँग्रेसचा दावा समोर आला आहे. त्यातील जवळपास २० उमेदवार निवडणुकीच्या बाबतीत गंभीर आहेत.
युथ काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी हिंमतसिंह, कृष्णा अलावरू आणि मी अशा तिघांच्या समितीने या उमेदवारांच्या दिल्लीत मुलाखती घेतल्या. मुलाखतींना इच्छुकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातून निवडक २० जणांची यादी आम्ही अखिल भारतीय युथ काँग्रेसचे सरचिटणीस सूरज हेगडे यांच्यावर सोपविली आहे. हेगडे ही यादी पक्षाच्या निवड समितीकडे सोपवतील.
हिंमतसिंह यांनी सांगितले की, या मुलाखतीसाठी राज्यातून ५२ उमेदवार आले होते. त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून २० ते २५ जणांची शॉर्टलिस्ट तयार करण्यात आली आहे. मतदारसंघ युवक काँग्रेसला सोडवून घेण्यासाठी काही निकष आम्ही निश्चित केले आहेत.
मतदारसंघ सोडवून घेण्याचे निकष असे
त्या मतदारसंघात काँग्रेसचा विद्यमान आमदार नको
सदर जागा आघाडीत काँग्रेसच्या वाट्यातील हवी
गेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा ५ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झालेला असावा
युवक काँग्रेसच्या उमेदवाराची विजयी होण्याची क्षमता हवी
२५ मतदारसंघांवर युवक काँग्रेसचा दावा
हिंमतसिंह,
महाराष्ट्र प्रभारी, युवक काँग्रेस
औरंगाबाद पश्चिम कुणाला?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील औरंगाबाद पश्चिम व परतूर या दोन मतदारसंघांत युवक काँग्रेसचे निकष पुरेपूर उतरतात. या दोन मतदारसंघांसह अहमदनगर शहर, अकोला पश्चिम, यवतमाळ शहर, ब्रह्मपुरी आदी मतदारसंघही उपरोक्त निकषांत तंतोतंत बसतात; परंतु मतदारसंघ निहाय आपण काहीही बोलू इच्छित नाहीत, असे कदम व हिंमतसिंह यांनीही स्पष्ट केले.

Web Title: Interviews for Legislative Assembly of Youth Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.