शहरात ९ मार्चपासून आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:28 IST2018-03-05T00:28:23+5:302018-03-05T00:28:27+5:30
शहरामध्ये पाचवी ‘जी.आय. व्हिजन-२०१८’ ही आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद ९ ते ११ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

शहरात ९ मार्चपासून आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरामध्ये पाचवी ‘जी.आय. व्हिजन-२०१८’ ही आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद ९ ते ११ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल. शिवाय ३६ रुग्णांवर २५ ते ४० हजार रुपये खर्चाच्या शस्त्रक्रिया मोफत होणार असून, त्याचे जगभरात थेट प्रक्षेपण होईल, अशी माहिती युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक व परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. उन्मेश टाकळकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेस युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व परिषदेचे आयोजन सचिव डॉ. अजय रोटे, डॉ. मनीषा टाकळकर, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीच्या डॉ. उज्ज्वला दहीफळे, डॉ. के दार साने, इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आय.एम.ए) अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल उपस्थित होते.
या संस्थांचा सहभाग-पुढाकार
सिग्मा ग्रुप आॅफ हॉस्पिटल्स, एशियन इन्स्टिट्यूट आॅफ गॅस्ट्रोइनट्रोलॉजी, हैदराबाद, महाराष्ट्र चाप्टर आॅफ ए. एस. आय., औरंगाबाद सर्जिकल सोसायटी, सिग्मा हेल्थ फाऊंडेशन, ‘आयएमए’ यांच्या संयुक्त विद्यमाने जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेस अमेरिके तील डॉ. नलिनी गुडा, डॉ. केनेथ बिनमोलर, पद्मभूषण डॉ. नागेश्वर रेड्डी, डॉ. अजय कुमार, डॉ. जी.व्ही. राव, डॉ. शोभना भाटिया, डॉ. रॉय पाटणकर, डॉ. उमेश भालेराव यांची उपस्थिती राहणार आहे.
अंडरवॉटर एंडोस्कोपी, फ्युचर आॅफ एंडोस्कोपी, एन.बी.आय, ओबॅसिटी सर्जरी यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ट्रेनिंग वर्कशॉपचेही आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक उपचार पद्धती आणि नवीन तंत्रज्ञानाची ओळख या परिषदेतून होणार आहे.