शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीला समुपदेशनाची सांगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:51 IST2017-07-19T00:43:30+5:302017-07-19T00:51:07+5:30

नांदेड : मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आंतरजिल्हा बदलीचा मार्ग बिंदूनामावली मंजूर झाल्यानंतर मार्गी लागला़ त्यानंतर जिल्ह्यातील ५६ शिक्षकांच्या आपसी बदल्या झाल्या़,

Intermediate counseling of teachers | शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीला समुपदेशनाची सांगड

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीला समुपदेशनाची सांगड

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आंतरजिल्हा बदलीचा मार्ग बिंदूनामावली मंजूर झाल्यानंतर मार्गी लागला़ त्यानंतर जिल्ह्यातील ५६ शिक्षकांच्या आपसी बदल्या झाल्या़, परंतु आता शासनाच्या नव्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी समुपदेशनाची अट घालण्यात आली आहे़ या आदेशानुसार सोमवारी १४२ शिक्षकांचे जिल्हा परिषदेत समुपदेशन ठेवण्यात आले होते़ परंतु शिक्षण विभागाकडून मुहूर्त टाळण्यात आला़ त्यामुळे बदलीपात्र शिक्षकांना पुढील आठवड्याची प्रतीक्षा करावी लागेल़
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात आली़ त्यानंतर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या़, परंतु अद्यापही संबंधित शिक्षकांना काही जिल्हा परिषदांनी कार्यमुक्त केले नाही़ तेव्हा संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे़ संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त न केल्यास जि़ प़ मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे़ यासंदर्भात शासनाने शिक्षकांना पदस्थापना देताना, दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व शिक्षकांच्या नियुक्तीच्या दिनांकानुसार सर्वप्रथम ज्येष्ठता याद्या करण्यात याव्यात, या यादीतील इच्छुक शिक्षकांना आदिवासी व नक्षलग्रस्त भागात नेमणुका द्याव्यात, इच्छुक नसल्यास कनिष्ठतम शिक्षकांना नेमणूक द्यावी, ज्येष्ठता यादीतील इच्छुकांना अवघड क्षेत्रात नियुक्ती द्यावी, कोणीही इच्छुक नसल्यास किंवा इच्छुकांची संख्या कमी असल्यास, सेवाज्येष्ठता यादीनुसार कनिष्ठतम शिक्षकांना अवघड क्षेत्रातील रिक्त जागी नेमणूक द्यावी, जिल्ह्यातील ज्या तालुक्यात रिक्त जागांची टक्केवारी सर्वाधिक आहे, अशा तालुक्यातील रिक्त जागा भरण्यात याव्यात, हे करताना इच्छुक शिक्षकांना त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे नियुक्ती द्यावी़ उरलेल्या रिक्त जागेवर नियुक्तीसाठी स्वच्छेने कोणी मागणी करत नसल्यास, त्या जागेवर समुपदेशनाने नेमणूक करावी, अशा सूचना दिल्या़ या क्रमाने रिक्त जागांची कमी टक्केवारी असणाऱ्या तालुक्यातील जागा भरण्यात येतील़

Web Title: Intermediate counseling of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.