इच्छुकांनो, उमेदवारी मिळाल्याच्या भ्रमात फिरू नका

By Admin | Updated: August 22, 2014 00:01 IST2014-08-22T00:01:37+5:302014-08-22T00:01:37+5:30

औरंगाबाद : शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुकांचा आकडा लांबत चालला आहे. काही जण तर उमेदवारी निश्चित असल्याच्या तोऱ्यात वागत आहेत.

Interestingly, do not forget about getting the candidacy | इच्छुकांनो, उमेदवारी मिळाल्याच्या भ्रमात फिरू नका

इच्छुकांनो, उमेदवारी मिळाल्याच्या भ्रमात फिरू नका

औरंगाबाद : शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुकांचा आकडा लांबत चालला आहे. काही जण तर उमेदवारी निश्चित असल्याच्या तोऱ्यात वागत आहेत. तर काही इच्छुक परस्पर मातोश्रीवर जाऊन उमेदवारीचा शब्द घेऊन येत आहेत. त्यामुळे आज खा.चंद्रकांत खैरे यांनी अनेकांच्या कानपिचक्या घेतल्या. पक्षात सध्या मीच नेता असल्याचे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. दरम्यान ‘मध्य’ मधून इच्छुक एक पदाधिकारी गुरुवारी रात्री मुंबईला उमेदवारीसाठी गेला.
इच्छुकांनी उमेदवारी मिळाल्याच्या भ्रमात फिरू नये, असे सांगून पक्ष सदस्य नोंदणी करा, पक्षासाठी स्वत:सारखा पैसा खर्च करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पक्षातील निर्णयावर आपली पकड मजबूत असल्याचे दाखविण्यासाठी ते आक्रमकपणे बोलत होते, असे सेनेच्या गोटातून समजले आहे.
कुणाचीही उमेदवारी अंतिम झालेली नाही. पक्ष सदस्य नोंदणीवरून ते चांगलेच घसरले. अडीच लाख रुपये खर्चून स्टीकर, पाट्या तयार केल्या. मात्र कुणीही त्यासाठी पुढाकार घेतला नाही. सदस्य नोंदणीसाठी महापौर कला ओझा यांनी परिश्रम घेतल्याचा दावा खा.खैरे यांनी केला.
शिवाई ट्रस्टच्या इमारतीत आज शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. २३ आॅगस्ट रोजी उद्धव ठाकरे शहरात येत असून, त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना जिल्हा व शहरातून सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदारांना सर्व कार्यक्रम रद्द करून त्यावेळी उपस्थित राहावे लागणार आहे.
बैठकीला महापौर कला ओझा, आ. प्रदीप जैस्वाल, आ. हर्षवर्धन जाधव, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आ. किशनचंद तनवाणी, सहसंपर्क प्रमुख सुहास दाशरथे यांच्यासह मनपातील पदाधिकारी व काही नगरसेवकांची उपस्थिती होती. आ. संजय शिरसाट, आ. आर. एम. वाणी हे बैठकीला गैरहजर होते. तर काही जिल्हा परिषद सदस्यांनीदेखील बैठकीला दांडी मारली.
महिला आघाडीला आहे संधी
महिला आघाडीने आता मैदानात उतरले पाहिजे. त्यांनाही काम करण्याची व उमेदवारी मिळण्याची संधी आहे. तसेही महापौर ओझा यांनी मध्य मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केलीच आहे. महिला आघाडीने घरची कामे कमी करून बाहेर पडावे. काहीही होऊ शकते. उमेदवारीही मिळू शकते, असा सूर बैठकीत आळवून दावेदारांच्या मनसुब्यांवर पाणी फेरण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Web Title: Interestingly, do not forget about getting the candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.