राजकीय समीकरणे बदलण्याच्या आशेवर इच्छुक

By Admin | Updated: September 20, 2014 00:03 IST2014-09-19T23:42:45+5:302014-09-20T00:03:34+5:30

हिंगोली : भाजपाशी असलेली युती तुटलीच तर हिंगोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची तयारी असावी यासाठी आज बैठक घेण्यात आली.

Interested on the hope of changing political equations | राजकीय समीकरणे बदलण्याच्या आशेवर इच्छुक

राजकीय समीकरणे बदलण्याच्या आशेवर इच्छुक

हिंगोली : भाजपाशी असलेली युती तुटलीच तर हिंगोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची तयारी असावी यासाठी आज बैठक घेण्यात आली. तर दुसरीकडे या संभाव्य घडामोडींवर नजर ठेवून असलेल्या राष्ट्रवादीच्या मंडळींचीही चाचपणी सुरू असल्याचे दिसते.
गेल्या काही दिवसांपासून भाजपा व शिवसेनेत सुरू असलेल्या शीतयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आज निर्माण झाली होती. अजूनही परिस्थितीचा अंदाज येत नाही. त्यामुळे सेना व भाजपातील कार्यकर्ते मात्र अस्वस्थ आहेत. शिवसेनेच्या वतीने तर आज हिंगोली विधानसभेच्या तयारीसाठी बैठकच घेण्यात आली. जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि. प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, शेतकरी संघटनेचे रामेश्वर शिंदे, तालुकाप्रमुख कडूजी भवर, सेनगावचे संतोष देवकर, जि. प. सदस्य ओमप्रकाश देशमुख, अशोक हरण, संपोष पोपळघट, डॉ. रमेश शिंदे, बबन नायक, भानुदास जाधव आदी उपस्थित होते.
युती न झाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी करण्याचे व झाल्यास एकत्रितपणे काम केले जाईल, असे ठरविण्यात आले. तोपर्यंत भाजपाच्या कोणत्याच कार्यक्रमाला शिवसैनिक जाणार नसल्याचे ठरले.
भाजपानेही जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्वीपासूनच सुरू असल्याचे दिसते. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही हाच कित्ता गिरविला होता. त्यामुळे हिंगोली व कळमनुरी या कॉंग्रेसकडेच असलेल्या मतदारसंघातही इच्छुक दिसत होते. कळमनुरीसाठीचा राष्ट्रवादीचा हट्ट लपून राहिलेला नाही. हिंगोलीच्या माजी खा. सूर्यकांता पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काही अफवा पसरल्या होत्या. त्यात माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात होते. आता युती तुटल्यास आघाडीतही बिघाडी होईल, अशी अटकळ बांधली जाते. त्यामुळे चव्हाण राष्ट्रवादीचे उमेदवार राहतील, असा अंदाज वर्तविला जातो. मात्र माजी आ. साहेबराव पाटील गोरेगावकर यांचे पक्ष पातळीवरील वजनही लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवाय कळमुनरीत भाजपाला लढण्याची वेळ आलीच तर जगजीत खुराणा यांच्या नावाची अटकळ बांधली जात होती. मात्र खुराणा यांनी राष्ट्रवादीकडून मुलाखत दिली होती. राष्ट्रवादीत कळमनुरीसाठी अगोदरच इच्छुकांच्या रांगा आहेत. युती व आघाडीत बिघाडी झाल्यास संभाव्य लढतीचा आराखडा मांडणे यावरून अवघड आहे. वसमतसारख्या मतदारसंघात मात्र दिग्गज इच्छुकांना एक नवा मार्ग सापडणार आहे. कॉंग्रेस व भाजपाचा एक नवा पर्याय या इच्छुकांसमोर असेल. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेची डोकेदुखी कमी होणार असली तरी विभाजनाचे भूत मानगुटीवर बसणार आहे. कळमनुरी व हिंगोलीकरांना मित्र व स्पक्षाची बंडखोरी नवी नाही. हिंगोलीत तर बंडखोरीशिवाय सरळ लढत झाल्याचा मागील काही निवडणुकांचा इतिहास नाही. केवळ नवीन चिन्हांची ओळख म्हणून लोक त्याकडे पाहतील. वसमतला मात्र ही बाब निवडणुकीत रंग भरणारी ठरेल. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Interested on the hope of changing political equations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.