आंतरजिल्हा आपसी बदलीत शिक्षकांकडून सौदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2016 23:02 IST2016-12-29T22:57:28+5:302016-12-29T23:02:03+5:30

लातूर आंतरजिल्हा आपसी बदलीसाठी जिल्ह्यात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या शिक्षकांच्या आपसात वाटाघाटी होण्याचे प्रमाण वाढले आहे़

Interdisciplinary interdisciplinary teacher deal! | आंतरजिल्हा आपसी बदलीत शिक्षकांकडून सौदा!

आंतरजिल्हा आपसी बदलीत शिक्षकांकडून सौदा!

हणमंत गायकवाड लातूर
आंतरजिल्हा आपसी बदलीसाठी जिल्ह्यात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या शिक्षकांच्या आपसात वाटाघाटी होण्याचे प्रमाण वाढले आहे़ खासकरून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले स्थानिक शिक्षक पर जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांसोबत सौदा करून बदली करून घेत आहेत़ २०११ ते २०१६ या कालावधीत जवळपास ३५० आंतरजिल्हा बदल्या झाल्या असून, त्यातील २२५ ते २५० स्थानिक शिक्षकांनी परजिल्ह्यात आपसी बदल्या करून घेतल्या आहेत़ येणाऱ्यांकडून १० ते १५ लाख रूपये खिशात टाकून ते परजिल्ह्यात गेल्याच्या चर्चा आहेत़ या ‘आपसी’ वाटाघाटीत किती शिक्षकांनी खिसा गरम करून घेतला, हे नक्की उघड झाले नसले तरी लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात याची चवीने चर्चा सुरू झाल्याने ‘मास्तर तुम्ही सुद्धा?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे़
परजिल्ह्यातून आपल्या स्थानिक लातूर जिल्ह्यात येणाऱ्या तरूण शिक्षकांचे १ हजार ६०९ प्रस्ताव लातूर जि़पक़डे आहेत़ यातील ७६ शिक्षकांना लातूर जि़प़च्या शिक्षण विभागाची काही दिवसांपूर्वीच नाहरकत मिळाली आहे़ पण, लातूर जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाणाऱ्या शिक्षकांचे केवळ ९० प्रस्ताव आहेत़ आंतरजिल्हा बदलीसाठी जागा नसल्यामुळे येणाऱ्यांना नाहरकत मिळत नाही़ त्यामुळे आपसीतून वाटाघाटीचा ‘लातूर पॅटर्न’ नावारूपास येत आहे़ लातूर जिल्ह्यातील स्थानिक असलेले आणि सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले काही शिक्षक पैशाच्या लोभापायी परजिल्ह्यात आपसीकरून जात आहेत़ २०११ ते २०१६ या कालावधीत ३५० आंतरजिल्हा बदली झाल्या़ त्यातील २२५ ते २५० आपसी बदल्यातील शिक्षक दीड ते दोन वर्षाच्या सेवानिवृत्तीवर आलेले होते़ त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत़ ३५० पैकी ८० ते १०० बदल्याच नियमानुसार झाल्याचे म्हंटले जाते़ विशेष म्हणजे बदल्या करून घेतलेले बहुतांश शिक्षक स्थानिकचे रहिवाशी आहेत़ सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना ते परजिल्ह्यात स्वखुशीने का गेले असावेत? असा, प्रश्न उपस्थित झाला आहे़ याशिवाय, बदलीच्या ठिकाणी गेल्यानंतर अनेकांनी रजा जास्त वापरल्या व निवृत्त होताच पुन्हा लातूर गाठून सेवानिवृत्तीचा आनंद घेत आहेत़ यापैकी काही शिक्षकांनी येणाऱ्यांकडून सौदा केल्याचे उघड-उघड बोलले जात आहे़ मात्र कुणी सौदा केला हे गुलदस्त्यातच आहे़ खुल्या प्रवर्गातील शिक्षकांच्या वाटाघाटी १० ते १५ लाख आणि इतर प्रवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी ९ ते १० लाखापर्यंत आपसात वाटाघाटी झाल्याचे बोलले जात आहे़ जाणारे शिक्षक सेवानिवृत्तीच्या वाटेवरले तर येणारे १० ते १२ वर्षे सेवा झालेले शिक्षक आहेत़ जास्तीत जास्त २ वर्षे सेवा राहिलेल्या शिक्षकांनीच आपसी बदल्या करून घेतल्याने हा संशय बळावला आहे़

Web Title: Interdisciplinary interdisciplinary teacher deal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.