सप्टेंबर अखेरपर्यंत ‘इंटरचेंज’ची कामे होतील पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:05 IST2021-07-09T04:05:16+5:302021-07-09T04:05:16+5:30

समृद्धी महामार्ग : शिर्डीपर्यंत वाहतूक सुरू करण्यासाठी विदर्भातील कामांचा अडथळा - विजय सरवदे औरंगाबाद : जिल्ह्यातील ११२ किलोमीटर लांब ...

The interchange will be completed by the end of September | सप्टेंबर अखेरपर्यंत ‘इंटरचेंज’ची कामे होतील पूर्ण

सप्टेंबर अखेरपर्यंत ‘इंटरचेंज’ची कामे होतील पूर्ण

समृद्धी महामार्ग : शिर्डीपर्यंत वाहतूक सुरू करण्यासाठी विदर्भातील कामांचा अडथळा

- विजय सरवदे

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११२ किलोमीटर लांब असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाने आता गती घेतली आहे. या महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, जांबरगाव व शेंद्रा एमआयडीसी या पाचपैकी शेंद्रा येथील ‘इंटरचेंज’चे काम सोडले, तर उर्वरित चार ठिकाणी ‘इंटरचेंज’ची कामे सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी व्यक्त केला आहे.

तथापि, या महामार्गावरून पहिल्या टप्प्यात ‘नागपूर ते शिर्डी’ मार्गे औरंगाबाद अशी वाहतूक सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. मात्र, नागपूर व विदर्भातील काही ठिकाणी कामे सुरूच असल्यामुळे तूर्तास तरी या महामार्गावरून वाहतूक सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात एल ॲण्ड टी व मेगा इंजिनिअरिंग या दोन कंत्राटदार संस्थांनी फेब्रुवारी २०१९ पासून कामाला सुरुवात केली. निविदेनुसार या दोन्ही संस्थांना कामे पूर्ण करण्याची मुदत सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. त्यानुसार एल अँड टी या कंत्राटदार संस्थेची गंगापूर व वैजापूर तालुक्यातील महामार्गाची संपूर्ण कामे सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील, तर तुलनेने मेगा इंजिनिअरिंगची कामे डिसेंबरअखेरपर्यंत चालतील. कोरोना संसर्गामुळे मागील वर्षापासून या महामार्गाची कामे प्रभावित झाली आहेत. परप्रांतीय मजुरांचा मोठा गट मोठ्या प्रमाणात गावी गेला होता. त्यामुळे कामाची गती मंदावली होती. सध्या ६० टक्के परप्रांतीय मजूर परतले असून, आता कामाने गती घेतली आहे.

या सहापदरी महामार्गावर रस्त्याची बहुतांशी कामे पूर्ण झाली असून, हडस पिंपळगाव, जांबरगाव, माळीवाडा आणि सावंगी इंटरचेंज, तर लासूर स्टेशनजवळ रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम प्रगतिपथावर आहे. ही कामे सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत इंटरचेंजसाठी भूसंपादन रखडले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथून पुढे इंटरचेंज उभारण्यासाठी चार महिन्यांचा अवधी लागणार आहे. या महामार्गावर औरंगाबाद तालुक्यातील पोखरी शिवारात २९० मीटर लांबीचा बोगदा (भुयारी मार्ग) तयार करण्यात येत आहे. दोन्ही बाजूने आरपार डोंगर कोरण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या बोगद्याच्या आतील बाजूचे मजबुतीकरणाचे (लाईनिंग) काम हाती घेण्यात आले आहे. हे बोगदेही सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

चौकट......

महामार्गावर पंप, चार्जिंग स्टेशन

या महामार्गावर औरंगाबादेतील ५ इंटरचेंजसह राज्यात २४ इंटरचेंज आहेत. प्रत्येक इंटरचेंजच्या ठिकाणी पेट्रोल पंप, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. या महामार्गावर दर २०० किलोमीटर अंतरावर एक फूड मॉल उभारले जाणार आहे. यासंदर्भात राज्यस्तरावर नियोजन केले जात आहे, असे ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले.

Web Title: The interchange will be completed by the end of September