नगर पालिकेच्या गाळ्यांची परस्पर विक्री...!
By Admin | Updated: January 5, 2016 00:04 IST2016-01-04T23:09:58+5:302016-01-05T00:04:35+5:30
रवी गात , अंबड अंबड नगरपालिकेने भाडेकरार पध्दतीने दिलेल्या अनेक दुकानांचा भाडेकरार संपुष्टात येऊन कित्येक महिने उलटून गेल्यानंतरही या दुकानांचा पुनर्लिलाव केला नसल्याने

नगर पालिकेच्या गाळ्यांची परस्पर विक्री...!
रवी गात , अंबड
अंबड नगरपालिकेने भाडेकरार पध्दतीने दिलेल्या अनेक दुकानांचा भाडेकरार संपुष्टात येऊन कित्येक महिने उलटून गेल्यानंतरही या दुकानांचा पुनर्लिलाव केला नसल्याने पालिकेचा लाखो रुपयांचा कर बुडत आहे. एकीकडे नागरिकांनी विकासकामांची मागणी केली असता पालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे सांगायचे व दुसरीकडे पालिकेतील काही जणांचे व्यापाऱ्यांशी असलेले हितसंबध सांभाळण्यासाठी या दुकानांच्या पुनर्लिलावाची प्रक्रिया लांबवायची अशा दुटप्पी पद्धतीने सध्या पालिकेचा कारभार सुरु असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे.
अंबड नगरपालिकेच्या मालकीची ९३ दुकाने ठराविक कालावधीच्या भाडेतत्वावर व्यापाऱ्यांना दिलेली आहेत. याबरोबरच पालिकेच्या जागेवर एकूण ६५ दुकाने सध्या भाडेतत्वावर सुरु आहेत. पालिकेला मिळणाऱ्या महसुलात भर पडावी व गरजू व्यापाऱ्यांना आपल्या उद्योग-व्यापाऱ्यांसाठी या दुकानांचा लाभ व्हावा अशा दुहेरी हेतूने पालिकेने ही दुकाने व जागा भाडेतत्वावर व्यापाऱ्यांना दिली. पालिकेने व्यापाऱ्यांशी ठराविक कालावधीचा भाडेकरारही केलेला आहे. यापैकी काही दुकानांचा ३० वर्षाचा, काहींचा ३ तर काहींचा ५ असा वेगवेगळ्या कालावधीचा भाडेकरार पालिकेसोबत झालेला आहे. यापैकी अनेक दुकानांची भाडेकराराची मुदत संपली आहे. मुदत संपलेल्या दुकानदारांनी आपल्या दुकानाचा ताबा नगरपालिकेला देणे बंधनकारक आहे. जर व्यापारी स्वत:हून दुकानाचा ताबा पालिकेला देत नसतील तर पालिका प्रशासनास दुकानाचा ताबा घेण्याचे अधिकार आहेत. मात्र पालिकेतील अनेकांचे व्यापाऱ्यांशी हितसंबंध गुंतलेले असल्याने भाडेकरार संपून कित्येक महिने उलटून गेल्यानंतर अद्यापही पालिकेच्या मालकीच्या दुकानांवर व्यापाऱ्यांचा ताबा कायम आहे. विशेष म्हणजे भाडेकराराचा मुदत संपल्यापासून सदर व्यापारी पालिकेच्या मालकीच्या दुकानांचा मोफत वापर करत आहेत. आजच्या काळात लाखो रुपयांचे भाडे मिळवू शकणारी ही दुकाने व्यापारी नाममात्र दराने अथवा मोफतपणे वापरत आहेत. पालिकेचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे काही व्यापाऱ्यांनी अंबड पालिकेकडून नाममात्र दराने भाडेकरार करुन दुकाने ताब्यात घेतली व नंतर या दुकानांची परस्पर विक्री करुन टाकली. पालिकेच्या मालकीची दुकाने काही महाभाग भाडेकरुंनी विकली तशीच ती दुकाने अंबड पालिकेच्या मालकीची आहेत हे माहिती असतानाही काही महाभागांनी ही दुकाने भाडेकरु व्यापाऱ्यांकडून पैसे देऊन खरेदी केली हे विशेष.यातील आणखी धक्कादायक प्रकार म्हणजे हे सर्व होत असताना पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना याची संपूर्ण माहिती मिळाली होती अशी चर्चा आहे, मात्र कोणीही हा सर्व प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला नाही.