मिरचीवरील रोग नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन गरजेचे
By Admin | Updated: April 19, 2016 01:10 IST2016-04-19T00:51:57+5:302016-04-19T01:10:27+5:30
जालना : मिरची पिकावरील रोग व कीड नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचा सूर कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रांच्या बैठकीतून निघाला.

मिरचीवरील रोग नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन गरजेचे
जालना : मिरची पिकावरील रोग व कीड नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचा सूर कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रांच्या बैठकीतून निघाला.
कृषी विज्ञान केंद्र , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मिरची पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर बैठक पार पडली. यावेळी कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी.भोसले यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. भाजीपाला संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बी.एस. खंदारे, वनस्पती विकृती शास्त्रज्ञ डॉ. ए.पी. दवंडे, किटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी.आर. झंवर, वनस्पती विकृती शास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही.जी. मुळेकर, सहाय्यक प्रा. डॉ. बी.व्ही.भेदे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.व्ही.सोनुने, प्राचार्य डॉ. ओ.डी. कोहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भोसले म्हणाले, जालना मिरची उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून मिरची पिकावरील विषाणू रोगाच्या प्रादूर्भावामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात किटक नाशकाचा वापर करतात. वातावरणातील प्रदूषण, सुरक्षितता व उत्पादन खर्च कमी करून विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी कीड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले. डॉ. बी.व्ही.भेदे यांनी मिरची पिकावरील फुलकिडे व पांढरी माशी यांच्या प्रादुर्भावामुळे विषाणूजन्य रोग वाढत असून योग्य वेळीच रोगांचे नियंत्रण करण्याचे आवाहन केले. डॉ.ए.पी. दवंडे यांनीही मार्गदर्शन केले. मिरची पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनावर मोड्यूल तयार करण्या संदर्भात चर्चा झाली. मिरची पिकावर मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी आपल्या प्रक्षेत्रावर व शेतकऱ्यांच्या शेतावर शास्त्रीय पद्धतीने चाचण्या घ्याव्यात असे ठरले. यावेळी प्रगतीशील मिरची उत्पादक उद्धवराव खेडेकर, काकासाहेब साबळे, छायाताई मोरे, अरूण सरकटे यांनी बैठकीत सहभाग घेऊन आपले अनुभव कथन करून सूचना केल्या. प्रास्तविक एस. व्ही. सोनुने यांनी केले. आभार प्रा. अजय मिटकरी यांनी मानले. (प्रतिनिधी)