अट्टल दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: July 6, 2014 00:35 IST2014-07-06T00:24:54+5:302014-07-06T00:35:23+5:30
औरंगाबाद : शहरातून दुचाकी चोरी करून त्या स्वस्तात विक्री करणाऱ्या एका अट्टल मोटारसायकल चोराला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली.

अट्टल दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात
औरंगाबाद : शहरातून दुचाकी चोरी करून त्या स्वस्तात विक्री करणाऱ्या एका अट्टल मोटारसायकल चोराला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीच्या आतापर्यंत तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कैलास पिराजी ढोकळे (२२, रा. चौसरनगर) असे आरोपीचे नाव आहे. या कारवाईबाबत उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या वाहन चोऱ्यांना आळा बसावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खबऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे.
चौसरनगरातील रहिवासी असलेला कैलास ढोकळे हा तरुण सतत नवीन दुचाकीवर फिरतो, अशी माहिती एका खबऱ्याने उस्मानपुरा पोलिसांना कळविली होती. त्या माहितीवरून पोलिसांनी कैलासला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एमएच-२१ एम-१८७१ या क्रमांकाची एक मोटारसायकलही सापडली. त्याला विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. खाक्या दाखविताच अखेर त्याने तोंड उघडले.
आपल्याकडे असलेली ही मोटारसायकल १ जून रोजी श्रेयनगरातून चोरी केल्याचे त्याने कबूल केले. तपासात ही मोटारसायकल श्रेयनगरातील विकास देशमुख यांची असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत कैलासने शहानूरवाडी आणि काल्डा कॉर्नर या परिसरातून आणखी दोन मोटारसायकली चोरी केल्याचेही सांगितले. त्या दुचाकी त्याने स्वस्तात विकून टाकल्या होत्या. या दोन्ही मोटारसायकलीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कैलासकडून आणखी काही वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक काकडे यांनी व्यक्त केली.