तब्बल सव्वालाख शेतकऱ्यांना विमा
By Admin | Updated: September 2, 2014 01:55 IST2014-09-02T01:41:33+5:302014-09-02T01:55:28+5:30
सुनील कच्छवे, औरंगाबाद सततची नापिकी आणि पावसाचा लहरीपणा, यामुळे जिल्ह्यात यंदा पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील

तब्बल सव्वालाख शेतकऱ्यांना विमा
सुनील कच्छवे, औरंगाबाद
सततची नापिकी आणि पावसाचा लहरीपणा, यामुळे जिल्ह्यात यंदा पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील तब्बल १ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी कापूस, मका आणि इतर पिकांचा विमा उतरविला आहे. या शेतकऱ्यांनी विम्याच्या हप्त्यापोटी तब्बल ७ कोटी ३५ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील काही वर्षांपासून सातत्याने नापिकीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच यंदा बहुसंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यास पसंती दिली आहे. कृषी विभागानेही यंदा पीक विम्यासंदर्भात विशेष जागृती मोहीम राबविली. गावोगाव विमा रथ फिरवून शेतकऱ्यांना पिकांचा विमा उतरविण्याचे आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात यंदा पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. पीक विमा काढण्यासाठी सुरुवातीला ३१ जुलैपर्यंत मुदत होती; परंतु नंतर ती वाढवून १६ आॅगस्ट करण्यात आली. या मुदतीत जिल्ह्यातील तब्बल १ लाख १८ हजार ५१२ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ३९ हजार ६५७ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. त्यापाठोपाठ वैजापूर तालुक्यातही २९ हजार ६६४ शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला. फुलंब्री तालुक्यात सर्वात कमी २५९१ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. जिल्ह्यात यंदा सुमारे ६ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये चार लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ दीड लाख हेक्टरवर मका पिकाची लागवड झाली आहे. उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद इ. पिकांची पेरणी झाली आहे.
दीड लाख हेक्टरला संरक्षण
जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ६ लाख ३० हेक्टर आहे. यापैकी दीड लाख हेक्टरला विम्याचे संरक्षण मिळाले आहे. पिकांचा विचार करता सर्वाधिक पीक विमा हा कपाशीचा काढला गेला असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.