शाळांच्या आवारात कॅमेरे बसविण्याच्या सूचना!
By Admin | Updated: December 6, 2014 00:17 IST2014-12-06T00:02:17+5:302014-12-06T00:17:32+5:30
औरंगाबाद : रिक्षाचालकांनीच शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे आता शाळकरी मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,

शाळांच्या आवारात कॅमेरे बसविण्याच्या सूचना!
औरंगाबाद : रिक्षाचालकांनीच शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे आता शाळकरी मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, अशा घटना रोखण्यासाठी शाळांनी आपल्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा व बसचालकाची संपूर्ण माहिती स्वत:कडे तर ठेवावीच ती संबंधित पोलीस ठाण्यातही द्यावी, असे पोलीस आयुक्तालयाने सर्वच शाळांना दिल्याचे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शहरातील एका रिक्षाचालक व त्याचा व्हॅनचालक साथीदाराने शाळेच्या आवारातच काही शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तीन दिवसांपूर्वी उघडकीस आला. या दोन्ही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीतील सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलविण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले. या बैठकीत अशा घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत मुख्याध्यापकांना सूचना देण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठका घेण्यात आल्याचेही उपायुक्तांनी सांगितले. त्याचबरोबर नुकतीच घडलेली घटना शाळेच्या आवारातच घडलेली आहे. त्यामुळे सर्व शाळांनी आपापल्या शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.