पोलिस निरीक्षकांना निर्देश ं
By Admin | Updated: July 25, 2016 00:40 IST2016-07-25T00:28:56+5:302016-07-25T00:40:14+5:30
लातूर : उदगीर तालुक्यातील कल्लूरनजीक झालेल्या भीषण अपघातानंतर पोलिस आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पोलिस निरीक्षकांना निर्देश ं
लातूर : उदगीर तालुक्यातील कल्लूरनजीक झालेल्या भीषण अपघातानंतर पोलिस आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी आपल्या किती कर्मचाऱ्यांकडे प्रवासी वाहने आहेत, याची माहिती संकलित करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहेत.
लातूर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना ‘ग्रुप’ कॉलव्दारे आपल्या हद्दीत सुरु असणाऱ्या अवैध धंद्यांना आवर घालण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या असून, ज्या दिवशी या सूचना दिल्या होत्या त्याच दिवशी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास अहमदपूर-उदगीर राज्य मार्गावरील कल्लूर ते एकुर्का रोड दरम्यान कंटनेर-जीपचा भीषण अपघात झाला. आपल्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला खतपाणी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर प्रथमत: दिला होता. मात्र, हा इशारा गांभीर्याने न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अपघातानंतर रस्त्यावर धावणाऱ्या अवैध प्रवासी वाहनांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भागिदारी असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्या विश्वासू कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
४जिल्हा पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांनी आपला मुलगा, पत्नी, भाऊ आणि जवळच्या नातेकवाईकांच्या नावे प्रवासी वाहतुकीसाठी वाहन खरेदी केल्याचे पुढे आले आहे. परिणामी, या वाहनांना पोलिस दलातील आपले वजन वापरुन बळ दिले जात आहे. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर ही वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून धावत असल्याची चर्चा जिल्हा पोलिस दलात सुरु झाली. याबाबत माध्यमातून वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, देवणी, चाकूर, जळकोट, औसा, रेणापूर आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील महत्त्वाच्या मार्गावर धावणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीत पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांची वाहने असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळाल्यानंतर, त्यांनी या माहितीची खातरजमा करण्यासाठी खास विश्वासातील कर्मचाऱ्यांवर काम सोपविले आहे.
४जिल्ह्यातील आपल्या हद्दीत अवैध व्यवसायाला खतपाणी घालत पाठबळ देणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी अशा अवैध व्यवसायाला पाठिशी न घालता आपल्या हद्दीतील अवैध व्यवसाय बंद करावेत, कायदा आणि सुव्यवस्था कायम अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. अवैध व्यवसायात ज्यांचा-ज्यांचा सहभाग राहील, अशा दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी दिली आहे.