मंत्रालयात ओळख असल्याची थाप मारून संस्थाचालकाला तब्बल ७० लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 11:59 IST2018-05-28T01:32:16+5:302018-05-28T11:59:37+5:30
मंत्रालयात ओळख असल्याची थाप मारून बजाजनगर येथील त्रिमूर्ती बालक मंदिर शाळेची संच मान्यता आणून देण्यासाठी संस्थाचालक महिलेला एक जणाने तब्बल ७० लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मंत्रालयात ओळख असल्याची थाप मारून संस्थाचालकाला तब्बल ७० लाखांचा गंडा
औरंगाबाद : मंत्रालयात ओळख असल्याची थाप मारून बजाजनगर येथील त्रिमूर्ती बालक मंदिर शाळेची संच मान्यता आणून देण्यासाठी संस्थाचालक महिलेला एक जणाने तब्बल ७० लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
रामेश्वर महादेवराव कानघुले (३८, रा. आर्च संकुल, शिवाजीनगर, मूळ रा.यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, जवाहरनगर येथील रहिवासी मेघा चंद्रकांत रेखे या शंकरबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा तर पुष्पा जोशी (रा. शास्त्रीनगर) अध्यक्षा आहेत. त्यांच्या संस्थेची बजाजनगर येथे त्रिमूर्ती बालक मंदिर ही १ ली ते ७ वीपर्यंत शाळा आहे. प्रत्येक वर्गात एक तुकडी अनुदानित तर दोन तुकड्या विनाअनुदानित आहेत. शाळेत एकूण २३ शिक्षक असून, यापैकी १५ शिक्षक ांना शिक्षण विभागाकडून वैयक्तिक मान्यता नाही. शिवाय शाळा दुरुस्ती अनुदान, लिपिक, सेवक पदे मंजूर करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत.
संस्थेच्या पदाधिकारी महिला असल्याने त्यांना नियमित जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन पाठपुरावा करणे शक्य होत नाही. ही बाब शाळेचा शिपाई सुनील चौधरी यास माहिती होती. चौधरी यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये आरोपी रामेश्वरची तक्रारदार यांच्याशी भेट घालून दिली. रामेश्वरची मंत्रालयात ओळख असून तो शाळेच्या संच मान्यतेची कामे करून देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीनेही त्यांना त्याची मंत्रालयात आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागात ओळख असल्याने शिक्षकांची संच मान्यता, नवीन पदे मंजूर करणे आणि इतर अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने संस्था पदाधिकाऱ्यांकडून त्याच्या शिवाजीनगर येथील घरात एकूण ७० लाख रुपये घेतले. ही रक्कम हातात पडल्यापासून तो काम लवकरच होईल, वरिष्ठस्तरावर फाईल आहे, अशी वेगवेगळी कारणे देत असे. त्याला पैसे दिलेले असल्यामुळे तक्रारदार आणि त्यांच्या शिक्षकांना त्याच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता.
काही दिवसांपूर्वी तर त्याने संस्थाचालक यांना तुमचे काम लवकरच होईल, असे कागदावर लिहून दिले आहे. मात्र तो सारखी वेळ मारून नेत असून, त्याने आपली फसवणूक केल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात येताच त्यांनी याविषयी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्या अर्जाची कसून चौकशी केल्यानंतर या तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आल्याने शनिवारी रात्री याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात आरोपी कानघुलेविरोधात विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली.