साडेचार हजारांऐवजी उद्दिष्ट केवळ २०० हेक्टरचे
By Admin | Updated: March 5, 2015 00:00 IST2015-03-04T23:51:57+5:302015-03-05T00:00:50+5:30
बदनापूर : तालुक्यात साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर विविध फळबागांची लागवड असताना कृषी विभागाने फळबाग पुनरूज्जीवनासाठी केवळ दोनशे हेक्टर फळबागेचे उद्दिष्ट

साडेचार हजारांऐवजी उद्दिष्ट केवळ २०० हेक्टरचे
बदनापूर : तालुक्यात साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर विविध फळबागांची लागवड असताना कृषी विभागाने फळबाग पुनरूज्जीवनासाठी केवळ दोनशे हेक्टर फळबागेचे उद्दिष्ट दिल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
यावर्षी या तालुक्यात जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची सरासरी असल्यामुळे तालुक्यातील अनेक तलाव व धरणे कोरडेठाक पडलेले आहेत. यामुळे तालुक्यातील पाणी पातळी अत्यंत खोलवर गेलेली असून अनेक विहिरी कोरड्या झाल्या आहेत. यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून बागायती शेतीतही भयानक पाणी टंचाई जाणवत आहे. या तालुक्यात दरवर्षी पडणाऱ्या अल्प पावसामुळे उसाची शेती नष्ट झाली आहे. त्यामुळे आता या तालुक्यात मोसंबी, डाळींब, पेरू, आवळा अशा फळबागांची बागायती शेती अल्प प्रमाणात शेतकरी करीत आहेत. त्यामुळे काही ठराविक शेतकऱ्यांना का होईना, या फळबागांमधून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या फळबागा जिवंत ठेवण्यासाठी या शेतकऱ्यांना पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचे टँकर, मल्चींग आच्छादन, बाष्पीभवन रोखणारे औषधी अशा विविध बाबींवर हजारो रुपये खर्च करावा लागत आहे. यामुळे फळबागा जिवंत राहतात. मात्र शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी घट होत आहे. परिणामी या तालुक्यातील फळबागा आर्थिकदृष्टया शेतकऱ्यांना डोईजड ठरत आहेत. यामुळे शासनाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सुरू केले आहे. यामधे जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करणे या घटकाअंतर्गत फळबागांना आर्थिक अनुदान दिले जाते. शासनाने या योजनेअंतर्गत आता ३५ हजार रुपये प्रति हेक्टर देणार असल्याचे घोषित केले आहे.
या तालुक्यात साडेचार हजार हेक्टर फळबागांचे क्षेत्र असताना या योजनेअंतर्गत या तालुक्याला केवळ २१२ हेक्टर उद्दिष्ट दिले आहे. यामुळे आता ही योजना म्हणजे आडातच नाही तर पोहऱ्यात काय येणार अशी झाल्याचे दिसत आहे.
या शासनाने या तालुक्यातील फळबागा व शेतकाऱ्यांना जिवंत ठेवायचे असेल तर जिल्ह्यात सर्वात जास्त दुष्काळी असलेल्या या तालुक्याला या योजनेअंतर्गत पूर्ण साडेचार हजार हेक्टर उद्दिष्ट देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. नसता ही योजना शेतकऱ्यांसाठी केवळ मृगजळ ठरणार यात शंका नाही. (वार्ताहर)
याबाबत तालुका कृषि अधिकारी एस. बी. घुले म्हणाले की या योजनेअंतर्गत आलेल्या उद्दीष्टापैकी या तालुक्यातील बदनापूर-१ व बदनापूर-२ कृषि मंडळ विभागाला प्रत्येकी ८० हेक्टर व दाभाडी कृषि मंडळ विभागाला ५२ हेक्टर अशाप्रकारे उद्दिष्ट देण्यात आले आहे आमच्याकडे शेतक-यांकडून या योजनेत सहभागी होण्याची जास्त मागणी असून याबाबत आम्ही वरीष्ठांकडे तसा प्रस्ताव पाठवू असे सांगितले.
शासनाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सुरू केले आहे. यामधे जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करणे या घटकाअंतर्गत फळबागांना आर्थिक अनुदान दिले जाते. शासनाने या योजनेअंतर्गत आता ३५ हजार रूपये प्रति हेक्टर देणार असल्याचे घोषित केले आहे