महिनाभरात रिक्षाला मीटर बसवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा
By राम शिनगारे | Published: June 23, 2023 01:11 PM2023-06-23T13:11:56+5:302023-06-23T13:18:21+5:30
वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय; महापालिका वाहतूक विभागाला सर्वतोपरी सहकार्य करणार
छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालक, मालकांनी त्यांच्या रिक्षांचे मीटरचे कॅलिब्रेशन एक महिन्यांच्या आत करून घ्यावे, त्यानंतर मीटर नसलेल्या रिक्षांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्याचवेळी विनापरवाना रिक्षा चालिवणाऱ्या रिक्षा जप्त करण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत दिले आहे.
पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस आयुक्तालयात वाहतूक सल्लागार समितीची बैठक गुरुवारी सायंकाळच्या वेळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मनपा प्रशासक जी. श्रीकांत, पोलिस उपायुक्त अपर्ण गिते, वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय मसिआचे अध्यक्ष, व्यापारी महासंघ, सराफा असोसिएशन, ट्रॅव्हल्स बस असोसिएशन, रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनीही बैठकीत सहभाग नोंदवला.
शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. रिक्षाचालकांनी रस्त्यावरून जाताना कोठेही रिक्षा उभी करू नये, इतर वाहनाला अडथळा निर्माण होईल असे कृत्य करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या. त्याशिवाय विनापरवाना सुरू असलेल्या रिक्षा ताबडतोब बंद करण्यात येणार असल्याचेही बैठकीत ठरविण्यात आले. तसेच शहरातील पार्किंगच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन काम करेल, अशी माहिती मनपा प्रशासकांनी बैठकीत दिली. तसेच वाहतूक पोलिसांना मनपाकडून आवश्यक ती सर्व प्रकारची मदतही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकेरी मार्गावरील वाहतुकीचे होणार नियमन
शहरातील पैठणगेट ते बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटीचौक, सुपारी हनुमान मंदिर, गुलमंडी, गोमटेश मार्केट, गांधीपुतळा, शहागंज, चेलीपुरा, शहागंज चमन या एकेरी मार्गाचा वापर करावा. या एकेरी मार्गाचा उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही बैठकीत ठरविण्यात आले.