अण्णा भाऊंच्या लेखनातून दलित लेखकांना विद्रोहाची प्रेरणा-फ़ मुं़
By Admin | Updated: September 6, 2014 00:28 IST2014-09-06T00:23:26+5:302014-09-06T00:28:13+5:30
अण्णा भाऊंच्या लेखनातून दलित लेखकांना विद्रोहाची प्रेरणा-फ़ मुं़

अण्णा भाऊंच्या लेखनातून दलित लेखकांना विद्रोहाची प्रेरणा-फ़ मुं़
नांदेड : दलित साहित्याची प्रेरणा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर असले तरी अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनातून दलित लेखकांना विद्रोहाची प्रेरणा मिळाली़ अंकुश सिंदगीकर यांनी ‘गंधरव’ या कथासंग्रहातून अण्णा भाऊंची ही पंरपरा कायम ठेवली आहे, असे प्रतिपादन प्रा़ फ़ मुं़ शिंदे यांनी केले़
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने यंदाचा बाबूराव बागुल कथालेखन पुरस्कार अंकुश सिंदगीकर यांच्या ‘गंधरव’ या कथासंग्रहाला देण्यात आला़ या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी कुसुम सभागृहात फ़ मुं़ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ माणिकराव साळुंखे होते़ प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री डी़ पी़ सावंत, स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर यांची उपस्थिती होती़
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या या उपक्रमाविषयी फ़ मुं़ म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळेच नवी पिढी घडली़ या विद्यापीठाने सामाजिक जाणिवा ठेवून हा प्रवास सुरू केला आहे़ नवलेखकांचा गौरव करून त्यांना लेखनासाठी बळ देणारे हे विद्यापीठ सामाजिक बांधिलकी जोपासत आहे़ अण्णा भाऊ साठे, बाबूराव बागुल, नारायण सुर्वे यांच्या साहित्याची परंपरा अंकुश सिंंदगीकर यांच्या मागे उभी आहे़ त्यामुळेच त्यांची कथा सशक्त आहे़
पालकमंत्री सावंत म्हणाले, कथाकारांचा गौरव करणे ही काळाची गरज आहे़ जास्तीत जास्त लेखकांना प्रोत्साहित करावे़ यासाठी स्वारातीम विद्यापीठात अण्णा भाऊ साठे, डॉ़ शंकरराव चव्हाण व श्री गुरूगोविंंदसिंघजी अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़
कुलगुरू डॉ़ विद्यासागर, कुलगुरू डॉ़ साळुंखे, लेखक सिंदगीकर, नांदेड विभागीय केंद्राचे संचालक पी़ एम़ शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक कुलसचिव प्रकाश आतकरे यांनी केले़ सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले़ (प्रतिनिधी)