महानिरीक्षकांकडून विसर्जन मार्ग पाहणी

By Admin | Updated: September 6, 2014 00:26 IST2014-09-05T23:55:01+5:302014-09-06T00:26:53+5:30

औंढा नागनाथ : येथील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची विशेष पोलिस महानिरीक्षक जगन नाथ यांनी शुक्रवारी दुपारी पाहणी केली.

Inspectors inspect the immersion path | महानिरीक्षकांकडून विसर्जन मार्ग पाहणी

महानिरीक्षकांकडून विसर्जन मार्ग पाहणी

औंढा नागनाथ : येथील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची विशेष पोलिस महानिरीक्षक जगन नाथ यांनी शुक्रवारी दुपारी पाहणी केली.
औंढा नागनाथ येथे सोमवारी सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीसाठी मार्गामधील अडथळे दूर करण्यासाठी तसेच सुरक्षेसाठी ही पाहणी करण्यात आली. श्री गणपतीची मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयापासून प्रारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने डॉ. हेडगेवार चौक, जुने बसस्थानक, जिरेगल्ली, जोशी गल्ली, चोंढेकर गल्ली, अण्णा भाऊ साठे चौक, सोनारगल्ली मार्गे मिरवणूक काढून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. या मार्गाची विशेष पोलीस महानिरीक्षक जगन नाथ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यावरून आलेल्या विद्युत वायर काढून घेण्यासह मिरवणुकीदरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक एन. अंबिका, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, नीलेश मोरे, पोनि लक्ष्मण केंद्रे, सपोनि ज्ञानोबा पुरी, जमादार नूरखाँ पठाण, शंकर इंगोले, काशीनाथ शिंदे, भीमराव चिंतारे, कैलास सातव, जिया पठाण हे होते.
अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
हिंगोली : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जगन नाथ यांनी शुक्रवारी हिंगोली जिल्हा दौरा करून महत्त्वाच्या ठिकाणी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली. दरम्यान, हिंगोली येथे बैठक घेवून अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले.
वसमत, औंढा येथे भेटी दिल्यानंतर महानिरीक्षक जगन नाथ शुक्रवारी दुपारी हिंगोलीत पोहोचले. पोलीस मुख्यालयात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन श्री विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच आगामी नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिबंधात्मक कारवाया करण्याबाबत त्यांनी सांगितले. बैठकीस पोलिस अधीक्षक एन. अंबिका, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक एस. टी. राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार (हिंगोली शहर), निलेश मोरे (ग्रामीण), पोनि शंकर सिटीकर, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक एम. एम. कारेगावकर, सतीशकुमार टाक आदी उपस्थित होते. दरम्यान, कळमनुरी येथेही त्यांनी भेट देवून पाहणी केली. (प्रतिनिधी)
हिंगोली शहरातील गांधी चौकापासून कयाधू नदीकडे जाणाऱ्या पारंपरिक श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची महानिरीक्षकांनी पाहणी करून उत्सवाच्या अनुषंगाने माहिती घेतली.
जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी ही शहरे सार्वजनिक गणेशोत्सव काळात संवेदनशील मानली जातात.
महानिरीक्षकांच्या दौऱ्यामुळे जिल्हाभरातील यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे चित्र शुक्रवारी पहावयास मिळाले.
आगामी नवरात्रोत्सव, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा महानिरीक्षक जगन नाथ यांनी घेतला.

Web Title: Inspectors inspect the immersion path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.