शहरात महानिरीक्षकांनी पाठवला डमी तक्रारदार

By Admin | Updated: June 6, 2017 00:46 IST2017-06-06T00:45:06+5:302017-06-06T00:46:43+5:30

जालना : पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांची तक्रार योग्य पद्धतीने घेतली जाते का, याची खातरजमा करण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांनी डमी महिला तक्रारदारास ठाण्यात पाठवले.

Inspector General of the city sent Dummy Complaint | शहरात महानिरीक्षकांनी पाठवला डमी तक्रारदार

शहरात महानिरीक्षकांनी पाठवला डमी तक्रारदार

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांची तक्रार योग्य पद्धतीने घेतली जाते का, याची खातरजमा करण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांनी डमी महिला तक्रारदारास ठाण्यात पाठवले. परंतु ठाणे अंमलदाराने गुन्हा नोंदविण्यास नेहमीप्रमाणे टाळाटाळ केली. याची गंभीर दखल घेत महानिरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यासह ठाणे अंमलदारास चांगलेच फटकारले. येथील सदर बाजार ठाण्यात हा प्रकार घडला.
औरंगाबाद परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी वर्षा संजय गोरे (३५, रा. कांचनवाडी, औरंगाबाद) यांना डमी तक्रारदार म्हणून येथील सदर बाजार ठाण्यात पाठवले. जालना बसस्थानकातून पर्स चोरी गेली आहे. संशयितांवर गुन्हा दाखल करावा, असे गोरे यांनी कर्तव्यावरील ठाणे
अंमलदारांना सांगितले. अंमलदाराने गुन्हा नोंदवून घेणे अपेक्षित असताना, पर्स गहाळ झाल्याचा अर्ज लिहून घेतला. याबाबत पोलीस महानिरीक्षकांनी सदर बाजार ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना खुलासा सादर करण्यास सांगितले. पोलीस निरीक्षकांनी ठाणे अंमलदारास सदर प्रकरणाबाबत खुलासा सादर करण्याबाबत नोटीस बजावली. अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बजावली आहे. या प्रकाराने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. यास पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनीही दुजोरा दिला आहे.

Web Title: Inspector General of the city sent Dummy Complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.