उदगीर पालिकेच्या मागे चौकशीचे पथक

By Admin | Updated: June 17, 2016 00:33 IST2016-06-17T00:15:38+5:302016-06-17T00:33:01+5:30

चेतन धनुरे , उदगीर उदगीर नगर परिषदेच्या मागे आता विभागीय पथकाच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले आहे़ आमदार सुधाकर भालेराव यांनी लक्षवेधीत केलेल्या मागणीनुसार विभागीय

Inspection squad behind Udgir Municipal Corporation | उदगीर पालिकेच्या मागे चौकशीचे पथक

उदगीर पालिकेच्या मागे चौकशीचे पथक


चेतन धनुरे , उदगीर
उदगीर नगर परिषदेच्या मागे आता विभागीय पथकाच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले आहे़ आमदार सुधाकर भालेराव यांनी लक्षवेधीत केलेल्या मागणीनुसार विभागीय आयुक्तांनी नेमलेले आठ अधिकाऱ्यांचे चौकशी पथक गुरुवारी उदगीरात धडकले़ त्यांनी तडक पालिका गाठून तक्रार असलेल्या १३ मुद्यांची तपासणी सुरु केली़
उदगीर नगरपरिषदेने अधिकाराबाहेर जावून कामे केल्याची व विकासकामात गैरव्यवहार केल्याची तक्रार आमदार सुधाकर भालेराव यांनी केली होती़ त्यास अनुसरुन ही चौकशी सुरु झाली आहे़ आमदार भालेराव यांनी नगर परिषदेची इमारत बेकायदेशीरपणे बांधून त्यात कंत्राटदार व नगरपरिषदेने गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे़ या इमारतीच्या पार्किंगमध्येही गाळे तयार करुन आर्थिक अफरातफर केल्याचा त्यांचा आक्षेप आहे़ तसेच उदगीर शहराचे क्षेत्र ६७२ हेक्टर्स असतानाही त्याबाहेर जावून ग्रामपंचायत हद्दींमध्ये कमानी उभारल्या व त्याआतील घरांकडून कर वसूल करुन त्याची नोंद पालिकेत न ठेवल्याचा आक्षेपही घेण्यात आला आहे़ पालिकेतील कर्मचाऱ्यांना नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली आहे़ नगरोत्थान योजनेअंतर्गत झालेल्या कामावर पुन्हा काम दर्शविणे व हद्दीबाहेर काम करुन आर्थिक गैैरव्यवहार करण्यात आला़ नगर परिषद हद्दीबाहेरील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची दिशाभूल करीत घरकूल मंजूर करण्यासाठी प्राथमिक मंजुरी देणे व नंतर त्यांची जागा हद्दीबाहेर असल्याचे सांगून फसवणूक केली़ शहरातील ग्रीनबेल्ट व उद्यानावर अनधिकृतपणे कब्जे करीत त्या जागा हस्तांतरीत करुन नामांतरही केल्याचा आरोप आमदार भालेराव यांनी केला आहे़ दलित वस्तीतील कामामध्ये तसेच पाणीपुरवठा योजनेत आर्थिक अफरातफर, सफाई कामात गैैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार भालेराव यांनी अधिवेशनादरम्यान लक्षवेधीद्वारे केला होता़ या मुद्यांची चौकशी करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते़ त्यानुसार विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी या मुद्यांची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले़ पुरवठा विभागाच्या विभागीय उपायुक्त वर्षा ठाकूर या पथकाच्या प्रमुख आहेत़ त्यांच्यासमवेत लातूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल यादव, नगरपरिषद विभागाच्या सहायक संचालक अलका फेरे, नगर रचना विभागाचे सहायक संचालक खरवडकर, तहसीलदार प्रशांत पडघन, नायब तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी, सहायक लेखाधिकारी केक़े़ सुंदर्डे, अव्वल कारकून डीक़े़ सुरे हे या चौकशी पथकात आहेत़ गुरुवारी दुपारी पथकातील काही अधिकारी उदगीर नगरपरिषदेत धडकले़ त्यांनी थेट चौकशीलाच सुरुवात केली़ आरोपातील मुद्यांनुसार कागदपत्रांची तपासणी सभागृहात चालू होती़ तेथे कोणासही प्रवेश दिला जात नव्हता़ सफाई कामगारांनी वेतनासंदर्भात भेटण्याचा प्रयत्न केला़ परंतू त्यांची भेट होऊ शकली नाही़

Web Title: Inspection squad behind Udgir Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.