नगराध्यक्षांना कर्मचाऱ्यांचा घेराव
By Admin | Updated: June 17, 2014 01:13 IST2014-06-17T00:43:19+5:302014-06-17T01:13:54+5:30
तुळजापूर : पगार मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी लेखणीबंद आंदोलन केले.

नगराध्यक्षांना कर्मचाऱ्यांचा घेराव
तुळजापूर : मागील १४ महिन्यांपासून नगर परिषदेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी लेखणीबंद आंदोलन करुन प्रभारी नगराध्यक्ष गणेश कदम यांना घेराव घातला. यामुळे काहीकाळ कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते.
नगराध्यक्ष गणेश कदम यांनी संतप्त कर्मचाऱ्यांना शांत करुन त्यांची कैफियत जाणून घेतली. यावेळी ५४ कर्मचाऱ्यांनी मागील १४ महिन्यापासून पगार मिळत नसल्याने आमची उपासमार होत असल्याचे सांगितले. सर्व प्रकारची विनंती, न्यायालय आदेश देवूनही आम्हास पगारापासून वंचित ठेवले जात आहे. आजपासून शाळा सुरु झाल्या असून, मुलांना वह्या, पुस्तके तसेच गणवेश घेण्यासही आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, तरी आम्हास तात्काळ वेतन द्यावे, अशी मागणीही यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.
यावर नगराध्यक्ष कदम यांनी मुख्याधिकारी दोन दिवस रजेवर असल्याने आपण आंदोलन स्थगित करावे. मुख्याधिकारी येताच दोन दिवसात २ महिन्यांचे वेतन निश्चित अदा करु, असे आश्वासन दिल्यानंतर रोजंदारी कर्मचाऱ्यांनी घेराव काढून आंदोलन मागे घेतले.
या वेतनासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात जिल्हाधिकारी यांनी दुसरे स्मरणपत्र देऊनही व उच्च न्यायालयाने आदेश देऊनही नगर परिषदेने कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांनी सदर आंदोलन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर)