लोह्यातील मग्रारोहयोच्या तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष पथक लोह्यात
By Admin | Updated: July 28, 2014 01:00 IST2014-07-28T00:22:02+5:302014-07-28T01:00:00+5:30
लोहा : लोहा तालुक्यातील विविध गावांत मग्रारोहयोअंतर्गत झालेल्या विविध विकासकामात झालेल्या करोडोंचा घोटाळा आता राज्यभर गाजल्याने वरिष्ठ पातळीवरून विशेष पथकामार्फत चौकशी

लोह्यातील मग्रारोहयोच्या तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष पथक लोह्यात
लोहा : लोहा तालुक्यातील विविध गावांत मग्रारोहयोअंतर्गत झालेल्या विविध विकासकामात झालेल्या करोडोंचा घोटाळा आता राज्यभर गाजल्याने वरिष्ठ पातळीवरून विशेष पथकामार्फत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सहा पथके लोहा तालुक्यात दाखल झाली आहेत़ सहा गावांतील सामाजिक अंकेक्षणअंतर्गत चौकशी होणार असल्याची माहिती लोह्याचे गटविकास अधिकारी व्ही़एऩ रंगवाळ यांनी दिली़
लोहा तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत विविध विकासकामे करण्यात आली़ मात्र त्यापैकी बहुतांश कामे ही केवळ कागदोपत्री असल्याची प्रकरणे समोर आली आहेत़ लोहा तालुक्यातील धानोरा (म़) येथे तर कामावर मयत, शिक्षक तसेच सैन्यातील जवान दर्शविण्यात आल्याच्या तक्रारीदेखील प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत़ त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी एका विशेष चौकशी पथकाची स्थापना केली आहे़ तर सदरील तपासदेखील अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती कार्यालयाकडून देण्यात आली़
लोहा तालुक्यातील ११८ गावांपैकी जवळपास ८५ ग्रामपंचायतीमध्ये मग्रारोहयोच्या कामाबाबत चौकशी केली जाणार आहे़ तर त्यापैकी धानोरा, सायाळ, भाद्रा, हाडोली, माळाकोळी, खेडकरवाडी, रिसनगाव या सात गावांत सामाजिक अंकेक्षणअंतर्गत विशेष चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदेशित करण्यात आले असून चौकशी समिती लोहा तालुक्यात दाखल झाली आहे़ १३ जुलैपर्यंत सदर समिती लोहा तालुक्यात तळ ठोकून राहणार आहे़ तर धानोरा (म़) येथील जवळपास १ कोटी ६३ लाखांचे प्रकरण सबंध महाराष्ट्रभर गाजल्याने समितीचे लक्ष धानोरा प्रकरणाकडे अधिक आहे़ सदरील समिती गावामध्ये जावून प्रत्यक्ष नागरिकांशी व मजुरांशी संपर्क साधून कामाबाबत सत्यता पडताळून घेणार आहे़ तसेच कामावर जाऊनही पाहणी करणार आहे़
लोहा तालुक्यातील सर्वात मोठा मग्रारोहयोचा घोटाळा आता उघडकीस येण्याची शक्यता आहे़ तर त्यामध्ये ग्रामसेवक, सरपंच, रोजगार सेवक अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे़ तर या घोटाळेबाजांना पाठीशी घालण्यासाठी काही राजकीय पोटभरू हालचाल करीत असल्याचे चित्र आहे़ सदर समिती लोहा तालुक्यात ३१ जुलैपर्यंत मग्रारोहयोच्या कामाची चौकशी करणार आहे़
एकंदरीत लोहा तालुक्यातील मग्रारोहयोच्या घोटाळ्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकामुळे पडलेला पडदा हटणार असून दोषींवर कार्यवाहीचा बडगा उगारला जाणार असल्याचे चित्र तूर्त निर्माण झाले आहे़ तर जिल्हाधिकाऱ्यांची विशेष समिती लोहा तालुक्यात अचानक आल्याने घोटाळे बाजाराचे धाबे दणाणले आहेत़ तर गटविकास अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या समितीचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे़ (वार्ताहर)