इंदू मिलच्या जागेवर उद्यानापेक्षा स्मारकावर भर द्यावा- हंडोरे
By Admin | Updated: January 3, 2016 23:54 IST2016-01-03T23:26:45+5:302016-01-03T23:54:27+5:30
जालना : इंदू मिल हस्तांतरण विधेयकास विरोध करणाऱ्या मंडळींनी सत्तेवर आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले खरे

इंदू मिलच्या जागेवर उद्यानापेक्षा स्मारकावर भर द्यावा- हंडोरे
जालना : इंदू मिल हस्तांतरण विधेयकास विरोध करणाऱ्या मंडळींनी सत्तेवर आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले खरे मात्र, या शासनाकडून तेथे आधीच जंगल असताना स्मारक लहान करून उद्यान बनविण्याचा खटाटोप सुरू आहे. आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने हा प्रयत्न हाणून पाडावा. या जागेवर स्मारकच मोठ्या स्वरूपात होण्यासाठी सर्वांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा भीमशक्ती संघटनेचे संस्थापक चंद्रकांत हंडोरे यांनी केले.
सावित्रीबाई फुले महिला मंडळ व धम्मोदय फाउंडेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती व माता सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा संकूल येथे विशाल जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी हंडोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. कैलास गोरंट्याल हे होते. यावेळी स्वागताध्यक्षा तथा नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, भन्ते एस. धम्मसेवक, संयोजक प्रमोदकुमार रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, एकबाल पाशा, दिनकर ओंकार, विनोद रत्नपारखे, सभापती राहुल हिवराळे, साहेबराव गवई, अरूण मगरे, बाबूराव वाकेकर, संजय भालेराव, रमेश गौरक्षक, सुनील इंगळे, आरेफ खान, रवींद्र अकोलकर, दिनकर घेवंदे, राजू मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, सामाजिक न्याय खात्याचा पदभार घेतल्यानंतर हंडोरे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या दलित बांधवांना विविध विकासाच्या योजना राबवून खऱ्या अर्थाने न्याय दिल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रमोदकुमार रत्नपारखे यांनी केले. सूत्रसंचालन अरूण मगरे यांनी तर राजू मोरे यांनी आभार मानले. तत्पूर्वी सकाळी धम्म रॅली काढण्यात आली. उद्घाटनानंतर भिख्खू संघाची धम्मदेशना देण्यात आली. सायंकाळी निळ्या पहाटेचा सूर्य हा बुद्ध भीमगितांचा प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास महिला, पुरूषांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. (प्रतिनिधी)