दर्जाहीन बियाणे विक्रेत्यांसह उत्पादकांवर गुन्हे दाखल करा
By Admin | Updated: April 11, 2017 00:15 IST2017-04-11T00:12:07+5:302017-04-11T00:15:16+5:30
जालना :दर्जाहीन बियाणे विक्रेत्यांसह उत्पादकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी दिले.

दर्जाहीन बियाणे विक्रेत्यांसह उत्पादकांवर गुन्हे दाखल करा
जालना : शेतकऱ्यांना पेरणीसाठी देण्यात येणाऱ्या बी-बियाणांच्या वाणाचा दर्जा उत्तम राखण्यात यावा. बियाण्यांचा दर्जा तपासण्यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात यावी. या तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या दुकानदारांसह उत्पादकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम २०१७ च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आ.राजेश टोपे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सभापती दत्ता बनसोडे, रघुनाथ तौर यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत गतवर्षात बँकांनी चांगले काम केले असल्याचे सांगत गतवर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक १ हजार २१६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. चालू वर्षातसुद्ध मागणीनुसार अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आल्याचे त्यांनी
सांगितले.
राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, शेतकऱ्यांना वेळेवर ट्रान्सफार्मर न मिळणे, वीजजोडण्या अचानकपणे तोडणे यासारख्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. महावितरणने याबाबत लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत यापुढे एकाही शेतकऱ्यांच्या किंवा लोकप्रतिनिधींची तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना देऊन कृषी विभागाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी आ. राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे यांनीही उपयुक्त अशा सूचना मांडल्या. सभेस विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.