फिरत्या वैद्यकीय पथकाची होणार चौकशी

By Admin | Updated: December 11, 2014 00:24 IST2014-12-11T00:23:03+5:302014-12-11T00:24:11+5:30

हिंगोली : फिरत्या वैद्यकीय पथकाची अनागोंदी उघड झाल्यानंतर आता वरातीमागून घोडे नाचविणाऱ्या जि. प. च्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावून चौकशीचे आदेश दिले

Inquiry will be done for a moving medical team | फिरत्या वैद्यकीय पथकाची होणार चौकशी

फिरत्या वैद्यकीय पथकाची होणार चौकशी

हिंगोली : फिरत्या वैद्यकीय पथकाची अनागोंदी उघड झाल्यानंतर आता वरातीमागून घोडे नाचविणाऱ्या जि. प. च्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावून चौकशीचे आदेश दिले. मात्र यात सखोल चौकशी करून प्रसंगी संबंधितावर कठोर कारवाईचे निर्देश जि. प. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांनी दिले आहेत.
पथकामार्फत औंढा, कळमनुरी व वसमत तालुक्यातील चाळीस गावांत सेवा दिली जाते. यात राजदरी, टेंभूर्णी, आमदरी, राजापूर, दरेगाव, खाटोडा तांडा, वाघी, शिंगी, मरसूळवाडी, खापरखेडा, रामवाडी, कुंभारवाडी, घोळवा, मोरवाडी, पार्डी, चिंचोर्डी, धानोरा, ढोलक्याची वाडी, कडपदेव, डोंगरगाव, मुधळ, जटाळवाडी, बिबगव्हाण, बेलथर, कुंभारवाडी, तोंडापूर, उमरदरावाडी, कोपरवाडी, भुरकेवाडी, माळधावंडा, काळ्याची वाडी, पावनमारी, महालिंगी, जामगव्हाण, टव्हा, बोल्डावाडी, निमटोक, वापटी, कुपटी या गावांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाने केवळ दिखावेगिरी करण्यासाठी नोटिसा बजावण्याची भूमिका घेतली आहे. असे न करता त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फंत तपासणी केली तर किती दिवस डॉक्टरांची हजेरी असते. किती रुग्ण तपासणी होते. आशा वर्कर, अंगणवाडीमार्फत किती नावे नोंदली जातात व मागच्या नोंदवहीनुसार किती रुग्णांची नावे लिहिली जातात, याबाबी त्यामुळे समोर येण्यास मदत होणार आहे.
या वाहनातील मनुष्यबळ प्रशिक्षित असले तरी त्यांना दिले जाणारे वेतनही कमी आहे. यात नर्सला ११६६४, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्मात्यास ९१00 तर चालकांना ७६१४ रुपये देणे अपेक्षित आहेत. मात्र चार हजारांवर कुणालाही वेतन दिले जात नाही.
याशिवाय देखभाल व दुरुस्तीसाठी ७ लाख १0 हजार, साहित्य देखभाल ४0 हजार, औषधी खरेदीसाठी ४.१६ लाख, वस्तू खरेदी १.४२ लाख व इतर खर्चासाठी १.१0 लाखांची तरतूद आहे. मात्र यापैकी किती खर्च होतो अन् किती बनवेगिरी याचा शोध आरोग्य विभागालाही लागणे अवघड आहे. कारण त्यांच्या पाठिंब्यावरच हे सगळे अगदी डोळे झाकून सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Inquiry will be done for a moving medical team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.