चौकशीचे ‘दुकान’ थाटले सुभेदारीत
By Admin | Updated: July 13, 2016 00:42 IST2016-07-13T00:24:02+5:302016-07-13T00:42:43+5:30
औरंगाबाद : सुभेदारीतील ‘वेरूळ-अजिंठा’ विश्रामगृहात मागील काही महिन्यांपासून विविध घोटाळ्यांच्या चौकशीचे ‘दुकान’ थाटण्यात आले आहे.

चौकशीचे ‘दुकान’ थाटले सुभेदारीत
औरंगाबाद : सुभेदारीतील ‘वेरूळ-अजिंठा’ विश्रामगृहात मागील काही महिन्यांपासून विविध घोटाळ्यांच्या चौकशीचे ‘दुकान’ थाटण्यात आले आहे. विशेष म्हणजे खुलेआमपणे सगळ्या गावाला तेथे घोटाळ्यांतील कामाची चौकशी सुरू असल्याची माहिती झाली. चौकशी अभियंतादेखील अधिकाऱ्याच्या तोऱ्यात वावरत असून ते विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांकडून पाहिजे ती सेवा करून घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खुलेआमपणे चौकशींचे काम सुरू असल्यामुळे ते पारदर्शक होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील काही कामांत घोटाळा झाला असून त्याच्या चौकशीची जबाबदारी जालन्यातील रस्ते विकास प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही.एल.भिरुड यांच्याकडे अधीक्षक अभियंता ए.बी.सूर्यवंशी यांनी सोपविली आहे. त्यानुसार भिरुड यांनी चौकशीसाठी मागील काही महिन्यांपासून सुभेदारी विश्रामगृहात ठाण मांडले आहे.
७ दिवसांच्यावर सुभेदारीतील खोली मिळत नाही; परंतु भिरुड यांना मागील काही महिन्यांपासून अजिंठ्यातील ५ क्रमांकाचा व्हीआयपी सूट देण्यात आला होता; परंतु काही तक्रारींमुळे गेल्या आठवड्यात त्यांना वेरूळमधील ७ (अ) हा सूट देण्यात आला. शासकीय कामातील अनागोंदीची चौकशी हे गुप्त काम असते; परंतु भिरुड हे सुभेदारीत बसून काही महिन्यांपासून चौकशी करीत आहेत. चौकशीचे काम पारदर्शक होणार काय असा प्रश्न आहे.
भिरुड यांना सूट उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्याकडे काही प्रकरणांच्या चौकशीचे काम सोपविण्यात आले आहे. परंतु ते तेथील कर्मचाऱ्यांना आर्थिक त्रास देत असल्याच्या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या नाहीत. याप्रकरणी माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे अधीक्षक अभियंता ए.बी.सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच विभागाच्या घोटाळ्यातील चौकशीचे काम गुप्त ठिकाणी होणे आवश्यक आहे. ते सुभेदारी विश्रामगृहात बसून होणारी चौकशी पारदर्शक होईल का? यावर सूर्यवंशी म्हणाले, या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर निश्चित निर्णय घेणे योग्य होईल.