स्वारातीच्या बांधकामाची आरोग्य संचालकाकडून चौकशी
By Admin | Updated: October 31, 2014 00:35 IST2014-10-31T00:07:05+5:302014-10-31T00:35:43+5:30
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आरोग्य विभागाच्या वतीने बांधकाम व इतर कामासाठी ९० लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

स्वारातीच्या बांधकामाची आरोग्य संचालकाकडून चौकशी
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आरोग्य विभागाच्या वतीने बांधकाम व इतर कामासाठी ९० लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या रुग्णालयाच्या बांधकामाची आरोग्य संचालकांनी चौकशीही केली आहे. तसेच या रुग्णालयातील रिक्त जागाही भरल्या जाणार असल्याने रुग्णांना येणाऱ्या अडीअडचणी दूर होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या निधीअंतर्गत सुरू असणाऱ्या कामांमध्ये गैरप्रकार झाला असल्याची तक्रार केल्यावरून या कामाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे अंबाजोगाई येथे आले होते. त्यांनी चौकशी केली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात असलेल्या रिक्त जागा महिनाभरात भरण्याचे आश्वासन ‘लोकमत’शी बोलताना दिले.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे मराठवाडयातील रुग्णांसाठी आशेचे केंद्र आहे. या रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांत बांधकाम व इतर कामांसाठी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीअंतर्गत होणाऱ्या कामांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. या तक्रारींची दखल घेत डॉ. शिनगारे यांनी अंबाजोगाईत रुग्णालयास भेट दिली. सुरू असलेल्या सर्व कामांची चौकशी केली. या संदर्भातील अहवाल ते वरिष्ठांकडे पाठविणार आहेत. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षक, कर्मचारी यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असून येत्या महिनाभरात ही पदे भरण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डेंग्यूसदृश आजारांमुळे रक्तातील पेशींची संख्या कमी व जास्त होण्याचे मोठे प्रकार वाढू लागले आहेत. यासाठी रुग्णालयातच रुग्णांसाठी रक्तातील पेशी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी माजी आ. पृथ्वीराज साठे, डॉ. सचिन काळे यांनी केली होती. या संदर्भात ठोस उपाययोजना आखण्याची सूचना त्यांनी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे केली आहे.(वार्ताहर)