अपहार प्रकरणाची समितीमार्फत चौकशी
By Admin | Updated: April 30, 2015 00:36 IST2015-04-30T00:30:31+5:302015-04-30T00:36:04+5:30
कळंब : कळंब नगर परिषदेच्या वतीने २०११-१२ मध्ये करण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडणी तोडणी करण्याच्या कामामधील अपहार प्रकरणाची

अपहार प्रकरणाची समितीमार्फत चौकशी
कळंब : कळंब नगर परिषदेच्या वतीने २०११-१२ मध्ये करण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडणी तोडणी करण्याच्या कामामधील अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कळंबचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.
२०११-१२ मध्ये कळंब न.प. ने मुख्य जलवाहिनीवरील अनाधिकृत नळजोडणी तोडण्याचे काम हाती घेतले होते. या कामाच्या नावाखाली तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्याने परस्पर संगनमताने व अत्यंत शिताफीने बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करुन निधीचा अपहार केल्याची तक्रार कळंब येथील प्रदीप उर्फ मनोज पांचाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याची गंभीरतेने दखल घेवून जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी या प्रकरणाची बारकाईने व सखोल चौकशी करण्यासाठी कळंबचे उपविभागीय अधिकारी बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीमध्ये उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग (जि.प.), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांचा तसेच चौकशीकामी उचित वाटतील त्या अन्य इतर अधिकाऱ्यांचा या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करावा, असेही या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सदरील समितीमार्फत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्वरित देण्याचेही आदेशीत करण्यात आले आहे. या आदेशामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)
कळंब न.प. तील सत्ताधारी मंडळीला हा या आठवड्यातील दुसरा झटका जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. नवीन सोनार लाईन अतिक्रमणप्रकरणी मुख्याधिकारी, अध्यक्षासह तक्रारदारांची सुनावणी ठेवल्यानंतर नळजोडणी तोडणीप्रकरणी थेट चौकशी समिती नेमून जिल्हाधिकाऱ्यांनी कळंब न.प. चा कारभार गंभीरतेने घेतल्याची चर्चा शहरवासियांमध्ये आहे.
हा एकूणच घोटाळा ३३ हजार रुपयांचा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात तयार करण्यात आलेली कागदपत्रे सुसंगत नाहीत. बिलांची अदायगी अगोदर आणि ठराव नंतर, कामे ठरावामध्ये नसतानाही ‘त्या’ कामांची बिले काढणे, अस्तित्वात नसलेल्या एजन्सीच्या नावे बिले काढणे आदी प्रकार यामध्ये झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश बजाविल्यानंतर उपविभागीय अधिकारी बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने लागलीच कामकाज हाती घेतले असून, तक्रारदार पांचाळ यांना ५ जून २०१५ रोजी हजर राहून पुरावे व म्हणणे सादर करण्याचे कळविण्यात आले आहे. याप्रकरणी ही समिती न.प. प्रशासनाकडूनही माहिती घेणार आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालाकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.