प्रभारी ‘बीडीओं’ना मारहाण
By Admin | Updated: March 24, 2016 00:42 IST2016-03-24T00:36:33+5:302016-03-24T00:42:59+5:30
कळंब : तालुक्यातील एकुरका येथील एका व्यक्तीने सीईओंच्या निर्देशानुसार रोजगार सेवकांच्या कामांसंदर्भात विचारणा करीत प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना चक्क

प्रभारी ‘बीडीओं’ना मारहाण
कळंब : तालुक्यातील एकुरका येथील एका व्यक्तीने सीईओंच्या निर्देशानुसार रोजगार सेवकांच्या कामांसंदर्भात विचारणा करीत प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना चक्क मारहाण केल्याची घटना बुधवारी येथील पंचायत समितीमध्ये घडली. याप्ररणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.
कळंब पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी शांता सुरेवाड या सध्या वैद्यकीय रजेवर असल्यामुळे सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन हरिदास राऊत यांच्याकडे गटविकास अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार आहे. बुधवारी राऊत हे कार्यालयीन कामकाजासाठी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उस्मानाबादकडे जाण्याच्या तयारीत असतानाच एकुरका येथील दीपक भिसे तेथे दाखल झाले. त्यांनी राऊत यांना कार्यालयाच्या पोर्चमध्ये अडवून रोजगार सेवकांच्या कार्यवाही बाबत विचारणा करुन शिवीगाळ केली तसेच राऊत यांना चापट लगावली. या प्रकारामुळे कळंब पंचायत समिती आवारात एकच खळबळ उडाली. घटना घडताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपले काम बंद केले. यानंतर सर्व कर्मचारी एकत्र येवून या प्रकाराचा निषेध करत होते. दरम्यान, याप्रकरणी प्रभारी गटविकास अधिकारी मोहन राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात दीपक भिसे यांच्या विरूद्ध भादंवि कलम ३३२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोहेकॉ सुनील सावंत करत आहेत. (वार्ताहर)