छत्रपती संभाजीनगर/ फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री ९ वाजता ‘पिस्तूल खरी की खोटी’ हे दाखविताना गोळी झाडली गेल्याने एक जण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणातील दोन्ही कर्मचारी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय सहाणे यांनी दिली.
सावंगी येथील भरत विजय घाटगे व करण सोमीनाथ भालेराव हे दोघे मित्र समृद्धी महामार्गाच्या सावंगी टोल नाक्यावर काम करीत होते. १२ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास टोल नाका येथील एका खोलीत दोघे बसलेले असताना करण याने त्याच्याजवळचे पिस्तूल काढले. यावेळी भरतने हे पिस्तूल नकली असल्याचे सांगितले. त्यानंतर करणने हे खरे आहे, तुला चालवून दाखवू का? असे म्हणून बंदुकीचे बटन दाबले. त्याक्षणी त्यामधून गोळी सुटली आणि समोर बसलेल्या भरतच्या पोटात घुसली. त्यानंतर करण फरार झाला. उपस्थितांनी भरत घाटगे याला रात्रीच घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर चार तास शस्रक्रिया करण्यात आली. गोळीने आतड्यास इजा झाली असून, ती पोटातील मासात घुसल्याने शनिवारी निघाली नाही. त्यासाठी आणखी शस्रक्रिया केली जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दोन पथकांकडून आरोपीचा शोध सुरूया घटनेतील जखमी आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सहा महिन्यांपूर्वी करण भालेराव याच्याविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे तर भरत घाटगे याच्याविरोधातही चोरीचा गुन्हा दाखल आहे. फरार करण भालेराव याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. तो लवकरच हाती लागेल, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय सहाने यांनी दिली.
कर्मचाऱ्यांचे कॅरेक्टर व्हेरिफेशनच नाहीसमृद्धी महामार्गावरील संपूर्ण टोलवर कर्मचारी नियुक्तीचे कंत्राट नागपूरच्या आश्मी रोड करिअर्स कंपनीकडे देण्यात आले आहे. संबंधित टोलच्या आसपासच्याच परिसरातील तरुणांची या ठिकाणी नियुक्ती करण्यावर कंपनी भर देते. यापूर्वी फास्ट गो कंपनीकडे याचे कंत्राट होते. आश्मी कंपनीने त्यांनी नियुक्त केलेले कर्मचारी कुठलेच कॅरेक्टर व्हेरिफेकेशन न करता कायम ठेवले. परिणामी, गंभीर गुन्हे दाखल असलेले कर्मचारी टोल नाक्यावर काम करत होते.
आता खात्री केली जाईलसदर घटनेतील दोन्ही कर्मचारी टोल सुरू झाल्यापासून नोकरीवर आहेत. त्यांची नियुक्ती पूर्वीच्या कंपनीकडून करण्यात आली असून, जुने असल्याने त्यांना कायम ठेवण्यात आले होते. कंपनीच्या व्यवस्थापनाला ही बाब कळवण्यात आली असून, आता प्रत्येक कर्मचाऱ्याला कॅरेक्टर व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.-अमोल वाघमारे, प्लाझा व्यवस्थापक