उच्चस्तरीय संशोधन केंद्रासाठी पुढाकार हवा
By Admin | Updated: July 23, 2014 00:42 IST2014-07-23T00:38:03+5:302014-07-23T00:42:21+5:30
तुकाराम तांबे , औरंगाबाद जुने फळसंशोधन केंद्र व एक लाख रुपये मराठवाडा कृषी विद्यापीठाने औरंगाबाद नगरपालिकेला सार्वजनिक बाग करण्यासाठी देऊन त्या बदल्यात हिमायत बाग ताब्यात घेतली.

उच्चस्तरीय संशोधन केंद्रासाठी पुढाकार हवा
तुकाराम तांबे , औरंगाबाद
जुने फळसंशोधन केंद्र व एक लाख रुपये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने औरंगाबाद नगरपालिकेला सार्वजनिक बाग करण्यासाठी देऊन त्या बदल्यात ४०.५ हेक्टर क्षेत्रफळाची हिमायत बाग २१ आॅक्टोबर १९७४ रोजी ताब्यात घेतली. त्यानंतर १९७५-७६ च्या दरम्यान हिमायत बागेच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून सध्याच्या फळसंशोधन केंद्राचे क्षेत्रफळ ११६.६४ हेक्टर आहे.
हिमायत बाग ही फार जुनी आणि ऐतिहासिक बाग असून ती पूर्वी हैदराबाद येथील एच.ई.एच. निजाम यांची खाजगी बाग होती.
हैदराबादचे एच.ई.एच. निजाम हे ज्या-ज्या वेळी औरंगाबादला येत असत त्या-त्या वेळी त्यांचे वास्तव्य किलेअर्क येथे असे. किलेअर्क या वास्तूला लागूनच हिमायत बाग आहे. या बागेत आंबा, पेरू, चिंच, बोर, कवठ, जांभूळ इत्यादी फळांच्या दुर्मिळ वाणांचा संग्रह करण्यात आलेला आहे.
फळसंशोधन केंद्राने विकसित केलेल्या फळझाडांच्या जातीमध्ये आंब्यामध्ये निरंजन, चिंचेमध्ये प्रतिष्ठान, नं. २६३ आणि अजिंठा गोड चिंच प्रसारित केली आहे, तसेच कवठामध्ये एलोरा, बोरामध्ये मुक्ता, अजिंरामध्ये दिनकर, बिबामध्ये सलेक्शन ३ व ४ आणि सीताफळामध्ये ताड पिंपळगाव-७ नावाच्या जाती प्रसारित करण्यात आल्या आहेत.
बागेच्या चारही बाजूने लोकवस्ती आहे. ३० टक्के सीमेवरती संरक्षित भिंतीचे काम झालेले आहे. ४० टक्के सीमेवरील संरक्षण भिंतीचे काम न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे होऊ शकलेले नाही, तसेच ३० टक्के सीमांवर लोकांच्या उपद्रवामुळे संरक्षक भिंतीची पडझड झालेली आहे. त्यामुळे नागरिकांची वर्दळ, मोकाट जनावरांची कळपे व गुंड लोकांची आडदांडशाही वाढत आहे.
९४ मंजूर पदापैकी फक्त ४२ पदे भरलेली असून ५२ पदे रिक्त, तसेच १२ कुशल/अर्धकुशल कर्मचारी मंजूर पदांपैकी ११ पदे भरलेली असून १ पद रिक्त व २४ रोजंदारी अकुशल मजुरांपैकी २१ रोजंदारी मजुराची पदे भरलेली असून ३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्व दैनंदिन कामावर, तसेच महसुली उत्पन्नावर विपरित परिणाम होत आहे.
हिमायतबागेसंबंधी एकूण १७ प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्यामुळे, तसेच ही प्रकरणे हाताळण्यासाठी अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे अधिकाऱ्यांचा जास्तीत जास्त वेळ विकास संशोधन व प्रशासन याकामाच्या ऐवजी न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यामध्ये जास्त जात आहे.
काय करायला हवे?
अंतर्गत वाहतुकीस नियंत्रण, नागरिकांचा ठराविक कालावधीमध्ये प्रवेश, मोकाट जनावरांपासून संरक्षण, चोरींवर नियंत्रण या बाबी नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी स्थानिर्क, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे सहकार्य आवश्यक असून जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाची आवश्यकता आहे. अशा प्रकारे एकात्मिक नियंत्रण मिळाल्यास हिमायतबाग एक उच्च स्तरीय संशोधन केंद्र म्हणून नावारूपास येऊ शकेल.