हैदरबाग रूग्णालय कार्यान्वीत करण्यासाठी पुढाकार
By Admin | Updated: December 17, 2015 00:20 IST2015-12-16T23:45:45+5:302015-12-17T00:20:17+5:30
नांदेड : महापालिकेच्यावतीने बांधण्यात आलेले हैदरबाग येथील सुसज्ज रूग्णालय मागील तीन, चार वर्षापासून बंद स्थितीत असून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत हे रूग्णालय कार्यान्वीत करावे,

हैदरबाग रूग्णालय कार्यान्वीत करण्यासाठी पुढाकार
नांदेड : महापालिकेच्यावतीने बांधण्यात आलेले हैदरबाग येथील सुसज्ज रूग्णालय मागील तीन, चार वर्षापासून बंद स्थितीत असून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत हे रूग्णालय कार्यान्वीत करावे, अशी मागणी माजी पालकमंत्री आ़ डी़ पी़ सावंत यांनी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याकडे केली़
शहरातील पूर्व दिशेला असलेल्या हैदरबाग हा शहरापासून दूर अंतरावर असून या भागातील लोकसंख्या अंदाजे २ लाख आहे़ या परिसरात गोरगरीब व मुस्लिम समाज मोठ्या संख्येने राहतो़ या भागात कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध नाही़ येथील नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी पायपीठ करावी लागते़ तातडीची आरोग्य सुविधा वेळेच्या आत न मिळाल्यास रूग्णांच्या जीवितास गंभीर धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सध्या शहरापासून जवळपास १० ते १२ कि़ मी़ अंतरावर विष्णूपुरी येथे स्थलांतर झाले आहे़ हैदरबाग व त्यालगत असलेल्या भागाची लोकसंख्या अंदाजे २ लाख आहे़ सन २००८ मध्ये गुरू - त्ता - गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने हैदरबाग येथे ५० खाटांचे भव्य इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते़ ज्याचे बांधकाम क्षेत्रफळ १ हजार ५३२ चौ़ मी़ असून त्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत़ मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती ५० खाटांचा दवाखाना चालविण्याची नसल्याने अल्पावधीतच या सुसज्ज इमारतीला कुलुप ठोकण्यात आले़ लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेली ही भव्य इमारत सध्या अडगळीला पडली आहे़ या इमारतीच्या काचा, दरवाजे, खिडक्या, फरशी यांची दुरवस्था झाली आहे़ दरम्यान, महापौर शैलजा स्वामी यांनीही यासंदर्भात आरोग्य मंत्र्यांना निवेदन दिले आहे़ (प्रतिनिधी)