गरोदर मातांची माहिती एका क्लिकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:54 IST2018-12-20T22:53:52+5:302018-12-20T22:54:29+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे गरोदर मातांसाठी ‘रिप्रॉडक्टिव्ह अॅण्ड चाईल्ड हेल्थ पोर्टल’ची (आरसीएच पोर्टल) संकल्पना राबविण्यात येत आहे. या पोर्टलमुळे गरोदर माता प्रसूतीसाठी माहेरी अथवा सासरी कुठेही गेली तरी डॉक्टरांना तिच्या प्रकृतीची माहिती एका क्लिकवर मिळेल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी दिली.

गरोदर मातांची माहिती एका क्लिकवर
औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे गरोदर मातांसाठी ‘रिप्रॉडक्टिव्ह अॅण्ड चाईल्ड हेल्थ पोर्टल’ची (आरसीएच पोर्टल) संकल्पना राबविण्यात येत आहे. या पोर्टलमुळे गरोदर माता प्रसूतीसाठी माहेरी अथवा सासरी कुठेही गेली तरी डॉक्टरांना तिच्या प्रकृतीची माहिती एका क्लिकवर मिळेल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी दिली.
शासकीय रुग्णालयात गरोदर मातांच्या विविध तपासण्या केल्या जातात. यात वजन, रक्तगट, हिमोग्लोबिन, बाळाचे वजन, सोनोग्राफी आदींचा समावेश असतो. यासंदर्भात नोंदी कार्डवर केल्या जातात; परंतु गरोदर माता जेव्हा प्रसूतीसाठी माहेरी अथवा अन्य ठिकाणी जातात, अशावेळी डॉक्टरांच्या नोंदी असलेले कार्ड अनेकदा सोबत नेले जात नाही. त्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांना नव्याने सर्व तपासण्या कराव्या लागतात आणि त्यानंतरच उपचार करता येतात. यामध्ये बराच वेळ निघून जातो. प्रसूतीच्या वेदनांनी महिला रुग्णालयात येते, तेव्हा या सर्व तपासण्यांमुळे अनेकदा धोकाही निर्माण होतो.
ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी आरसीएच पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक गरोदर मातेच्या तपासण्यांची, प्रकृतीची माहिती नमूद केली जाते. त्यामुळे गरोदर माता प्रसूतीसाठी जेथेही जाईल, तेथे एका क्षणात तिची संपूर्ण माहिती डॉक्टरांना उपलब्ध होते. त्यामुळे प्रसूतीतील अडथळे दूर होण्यास मदत होते.
आॅनलाईनची व्यवस्था
जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अशी सर्वत्र ही यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. काही कारणांनी त्यात अडचण येते; परंतु आगामी काळात प्रशिक्षित कर्मचारी आणि आॅनलाईनची व्यवस्था उपलब्ध करून देऊन हे पोर्टल १०० टक्क्के कार्यान्वित होईल, असे डॉ. लाळे यांनी सांगितले.