शाखाप्रमुख देणार घरोघरी योजनांची माहिती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 01:10 IST2016-09-01T00:51:36+5:302016-09-01T01:10:04+5:30
उस्मानाबाद : केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र केवळ माहितीअभावी साठ टक्क्यांच्या आसपास लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ होत नाही.

शाखाप्रमुख देणार घरोघरी योजनांची माहिती !
उस्मानाबाद : केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र केवळ माहितीअभावी साठ टक्क्यांच्या आसपास लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ होत नाही. त्यामुळेच या योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहंचविण्यासाठी ‘शिवसेना आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी सांगितले. या माध्यमातून शाखाप्रमुख प्रत्येक कुटुंबांना विविध योजना, त्यासाठी लागणारी कागदपत्रे आदी बाबींची माहिती प्रत्यक्ष भेटून देतील. शाखाप्रमुखांच्या या कामाचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतसांगितले.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांच्या विकासासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. परंतु, विविध कारणांमुळे आजही सदरील योजना गरजू कुटुंबांपर्यंत पोहोंचत नाहीत. उस्मानाबाद तालुक्यातील वडगावातील कुटुंबांचा सर्वे केला असता, तब्बल ६० टक्के कुटुंबे वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले. एवढेच काय, अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाही अनेक योजनांबाबत माहिती नसल्याचे पुढे आल्यानंतर ‘शिवसेना आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात ते म्हणाले. याअनुषंगाने २ सप्टेंबर रोजी सर्व शाखाप्रमुखांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. हे सर्व शाखाप्रमुख गावागावात जावून प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या योजनांची माहिती देतील. एवढेच नाही, तर योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोंचविण्यामध्ये ज्या काही अडचणी येतील, त्या सोडविण्याच्या अनुषंगाने प्रत्येक पंधरा दिवसाला मी स्वत: आढावा घेणार असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील अनेक तरूण उद्योग-व्यवसाय करू इच्छितात. परंतु, भांडवल नसल्याने अडचणी येतात. येणाऱ्या काळात अशा तरूणांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोवरी प्रयत्न करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)