संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती अनुपलब्ध
By Admin | Updated: August 25, 2014 01:39 IST2014-08-24T23:53:13+5:302014-08-25T01:39:21+5:30
वडवणी : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वडवणी तहसीलमध्ये निराधारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र वडवणी तालुक्यात एकूण किती निराधार आहेत?

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती अनुपलब्ध
वडवणी : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वडवणी तहसीलमध्ये निराधारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र वडवणी तालुक्यात एकूण किती निराधार आहेत? याची माहिती तहसीलमध्ये अनुपलब्ध असल्याने संताप व्यक्त होत आहे. तहसीलदारही टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याने माहिती मागायची कोणाकडे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
१३ आॅगस्ट रोजी वडवणी तालुक्यातील कान्हापूर येथील ८० वर्षीय रुक्मीणबाई सूर्यभान सरगर यांना आपले प्राण गमवावे लागले होते तर दोन महिन्यापूर्वी बँकेत आलेल्या पद्मीनबाई जावळे यांचाही बँकेच्या पायऱ्यावरच मृत्यू झाला होता. निराधारांचा गंभीर प्रश्न असतानाही याकडे तहसीलदार मात्र दुर्लक्ष करीत आहेत. वडवणी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेत किती लाभार्थी आहेत? याची माहिती आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे तहसीलदार एन.जी. झंपलवाड यांनी सांगितले. ही माहिती माझ्याकडे नसते, दुसऱ्यांना विचारा, अशी टोलवाटोलवीची उत्तरेही झंपलवाड देत असल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या वतीने प्रत्येक निराधार लाभार्थ्याला त्याचे नाव यादीत आले किंवा नाही हे त्याच्या घरी पत्र पाठवून कळविले जाते. मात्र वडवणी तहसीलच्या मनमानी कारभारामुळे असा कुठलाही प्रकार येथे होत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळेच रुक्मीणबाई सरगर यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या दिवशीपासून आजपर्यंत कुठलीही काळजी वडवणी तहसीलच्या वतीने घेतली जात नसल्याचे उघड झाले आहे. तहसीलदार झंपलवाड मात्र निराधारांना ‘वेटींग’वर ठेवून त्यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप लाभार्थ्यांतून होत आहे. (वार्ताहर)